Ministry of Defence : प्रादेशिक सैन्याचे अधिकार लष्करप्रमुखांना; संरक्षण मंत्रालयाने जारी केली अधिसूचना

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत वाढत्या तणावादरम्यान, संरक्षण मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला असून आता नियमित सैन्य त्यांच्या मदतीसाठी प्रादेशिक सैन्याला अर्थात टेरेटोरियल आर्मीला बोलावू शकते. यासंदर्भातील सर्वाधिकार लष्करप्रमुखांना देण्यात आले आहेत. लष्करप्रमुखांना आता त्यांच्या विवेकबुद्धीनुसार मदतीसाठी प्रादेशिक सैन्याला लष्करी कारवाईत सहभागी करण्याचा अधिकार असेल.
भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तान इतका घाबरला आहे की, त्याने नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू केला आहे. भारतीय लष्करही या गोळीबाराला योग्य उत्तर देत आहे. पाकिस्तानच्या या गोळीबारात उरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय सैन्याने त्यांचे सर्व मनसुबे उधळून लावले.
प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने केवळ २ एफ-१६ सह ४ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली नाहीत तर पाकिस्तानच्या पंजाबमध्ये एक एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम अर्थात अवॅक्स विमानही पाडले. या एकाच मोठ्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या हवाई देखरेख आणि युद्धभूमीच्या क्षमतेला मोठा धक्का बसला आहे. इस्लामाबादच्या अवॅक्स विमानाच्या विध्वंसामुळे पाकिस्तान कसा आंधळा झाला आहे.
भारताने पाकिस्तानच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्रे डागली, ज्यामुळे तेथे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पाकिस्तानमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. सर्वत्र धूर आहे. भारतीय क्षेपणास्त्रांनी येथे मोठ्या प्रमाणात विनाश घडवून आणला आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या शहरांमध्ये लाहोर, इस्लामाबाद, कराची, सियालकोट, बहावलपूर आणि पेशावर यांचा समावेश होता.





