ग्रॅन्ड ब्लांक टानशीप : मिशीगन येथील एका चर्चवर झालेल्या सशस्त्र हल्ल्यामध्ये किमान ४ जण ठार झाले असून ८ जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या गोळीबारात हा हल्लेखोर ठार झाला. रविवारी सकाळी प्रार्थनेच्या निमित्ताने या चर्चमध्ये शेकडो जण उपस्थित असताना हा हल्ला झाला. हल्लेखोराने चर्च ऑफ जीजस ख्राईस्ट ऑफ लॅटर चर्चच्या प्रवेशद्वारावर एक पिकअप ट्रकची जोरदार धडक दिली. या टट्रकवर अमेरिकेचे दोन ध्वज लावलेले होते. प्रवेशद्वाराला धडकदिल्यानंतर हल्लेखोर ट्रकमधून उतरला आणि त्याने गोळीबाराला सुरुवात केली. पोलिसांना या हल्ल्याबद्दल त्वरित कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोचताच हल्लेखोर चर्चपासून दूर पळून गेला. मात्र दोन अधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर झालेल्या चकमकीमध्ये हल्लेखोराला गोळ्या घालून ठार करण्यात आले, या गोळीबारामध्ये ४ जण ठार झाले, तर ८ जण जखमी झाले होते, असे पोलीस प्रमुख विल्यम रेनये यांनी पत्रकारांना सांगितले. त्याच्याकडे काही स्फोटके देखील होती. मात्र त्याने या स्फोटकांचा वापर केला का नाही, हे त्वरित समजू शकले नाही, असे अल्कोहोल, तंबाखू, बंदुक आणि स्फोटके ब्युरोचे जेम्स डायर म्हणाले. चर्चबाहेर चकमक सुरू असताना चर्चच्या आत असलेल्या नागरिकांनी लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते. हल्लेखोराने ज्वालाग्रही पदार्थ ओतून चर्चला आग लावली होती. ही आग बऱ्याच वेळाने आटोक्यात आणण्यात आली. आगीमुळे एक व्यक्ती गंभीर तर अन्य ७ जण किरकोळ भाजल्याचे आढळले. काही जण बेपत्ता असल्याचेही लक्षात आले आहे. मात्र त्यांचा नेमका आकडा उपलब्ध नाही.मिशीगनमधील हल्ला हा २४ तासात झालेला दुसरा हल्ला होता. शनिवारी रात्री नॉर्थ कॅरोलिनामध्ये साऊथपोर्ट येथे एका बोटीवर झालेल्या गोळीबारात तिघे ठार झाले होते. हल्ल्याचा हेतू स्पष्ट नाही.. हल्लेखोराचे नाव थॉमस जेकब सॅनफोर्ड असल्याचे निष्पन्न झाले. तो बर्टन शेजारच्या छोट्या गावचा रहिवासी होता. या हल्ल्यामागे त्याचा नेमका हेतू काय होता, हे स्पष्ट होऊ शकले नाही. चर्चच्या आवारात बॉम्ब असल्याच्या शक्यतेने तपासणी केली गेली. पण कोणताही बॉम्ब आढळला नाही. गेल्या २० वर्षात अमेरिकेत विविध प्रार्थनास्थळांवर हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात मिनियापोलिस येथील चर्च ऑफ अनुनसिएशिनमध्ये सामुदायिक प्रार्थनेच्यावेळी झालेल्या गोळीबारात दोन लहान मुले ठार झाली होती.