Pune news — पाषाण तलाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच साचल्याने गंभीर पर्यावरणीय व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच जलपर्णीने पूर्णपणे व्यापलेल्या तलावात आता जलजीवन धोक्यात आले असून, परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मागील पाच दिवसांपासून तलावात हजारोंच्या संख्येने मासे मृत अवस्थेत तरंगताना दिसत आहेत. यामुळे पाण्याची गुणवत्ता अधिकच खालावली असून, दुर्गंधीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे. तसेच, कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. तलावात वाढलेल्या जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटले असून, त्यातच मोठ्या प्रमाणात सांडपाणी थेट तलावात सोडले जात असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. परिसरात उभारण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र अपुऱ्या क्षमतेचे असल्याने दूषित पाणी थेट तलावात मिसळत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी पुणे महानगरपालिका प्रशासनावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला जात आहे. योग्य वेळी उपाययोजना न केल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांनी प्रशासनाला इशारा देत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर मृत मासे व जलपर्णी हटवून तलावाची स्वच्छता न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. नागरिकांकडून तलावातील सांडपाणी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना, जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवणे आणि नियमित देखभाल करण्याची मागणी होत आहे. अन्यथा, ही समस्या आणखी गंभीर होऊन पर्यावरणासोबतच नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.