मेस्सी बनला पहिला फ्रिलान्स फुटबॉलपटू

लंडन – अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा बार्सिलोनासोबतचा करार संपुष्टात आला आहे. 20 वर्षांपासून मेसी बार्सिलोना क्लबसोबत खेळत होता. अद्याप मेस्सीला कोणत्याही क्लबने करारबद्ध केले नसल्याने सध्या तरी मेस्सी जगातील पहिला फ्रिलान्स फुटबॉलपटू ठरला आहे. आता तो करारबद्ध होईपर्यंत कोणत्याही क्लबकडून खेळू शकतो.
30 जूनपूर्वी मेस्सीसोबत नवा करार करण्यास स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोना अपयशी ठरला आहे. 34 वर्षीय मेस्सीने मागच्या वर्षी बार्सिलोना क्लब सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, क्लबने त्याला सोडण्यास नकार दिला होता. मेस्सी त्याच्या फुटबॉल कारकिर्दीत पहिल्यांदाच कोणत्याही क्लबसोबत नाही. त्यामुळे आता मेस्सी इतर कोणत्याही क्लबमधून खेळण्यास स्वतंत्र आहे.
सध्या कोपा अमेरिका स्पर्धेत मेस्सी अर्जेंटिनाचे नेतृत्व करत आहे. मेस्सी बार्सिलोनाकडे पुन्हा परतण्याची शक्यता आहे. मात्र, करार नसल्याने मेस्सी 7 हजार 504 दिवसांनंतर पहिल्यांदाच कोणत्याही कराराशिवाय क्लबमध्ये खेळताना दिसेल. मेस्सीच्या जाण्याने बार्सिलोना क्लब आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. चॅम्पियन लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत बायरन म्युनिचकडून 8-2 असा पराभव सहन करावा लागला होता.
मेस्सी 13 वर्षांचा असल्यापासून बार्लिलोना क्लबसोबत खेळत आहे. चार वर्षे प्रशिक्षण घेतल्यावर मेस्सीने बार्सिलोना सीनिअर संघासोबत खेळण्यास सुरुवात केली होती. मेस्सीने 17 वर्षांत 35 किताब आपल्या नावे केले आहेत. त्याचबरोबर बार्सिलोना क्लबकडून खेळताना त्याने 778 सामन्यांत एकूण 672 गोल केले आहेत.
पाच वेळा फिफा प्लेअर ऑफ द इअर असलेल्या मेस्सीने 2017 साली नव्याने करार केला होता. हा करार 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आला होता. बार्सिलोनाने तेव्हा जवळपास 5 हजार 400 कोटींचा करार केला होता.





