Pimpri : मुलं मोबाइलच्या विळख्यात तर नाहीत ना?

चिखली : मोबाइल हे आजच्या युगात अनिवार्य साधन झाले आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असणे ही गरज झाली आहे. मात्र माबाइलचा अतिवापर आता चिंता निर्माण करणारा विषय ठरत आहे. विशेषतः लहान मुलांपासून तरुणांपर्यंत मोबाइलचा वाढता वापर पालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. मोबाइलचा विळखा’ ही संज्ञा आता समाजातील प्रत्यक्ष वास्तव बनत चालली आहे.
सध्या मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यात मोबाइलचा गैरवापर वाढत चालला आहे. त्याचे गंभीर दुष्परिणाम समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी ऑनलाइन गेममुळे देहूरोड आणि पिंपरी चिंचवड शहरात दोन मुलांनी आत्महत्या केल्या होत्या. तसेच एका लहान मुलाने आपल्या वडिलांच्या खात्यातून तब्बल पाच लाख रुपये ऑनलाइन गेममधील वेपन खरेदीसाठी खर्च केले होते. याचाच दुसरा टोकाचा परिणाम म्हणजे एका तरुणाने ऑनलाइन गेमच्या नशेमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना. हे प्रकार मोबाइलच्या विळख्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या किती गंभीर आहेत हे दाखवून देतात.
अनेक आजारांचे कारण मोबाइल
मोबाइलच्या अतिवापराचे दुष्परिणाम आरोग्य, मानसिक स्थिती, सामाजिक संबंध आणि शैक्षणिक प्रगतीवर थेट दिसून येतात. सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांवर ताण, डोकेदुखी, दृष्टी कमी होणे, तर मानसिकदृष्ट्या नैराश्य, चिडचिडेपणा, एकाग्रतेचा अभाव अशा समस्या निर्माण होतात. मोबाईलमुळे मुलांची झोप बिघडते, अभ्यासाकडे दुर्लक्ष होते आणि एकटेपणाची भावना वाढीस लागते.
उपाययोजना आवश्यक
या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. वेळेचे नियोजन, मोबाइलमुक्त तास, कुटुंबीयांसोबत वेळ घालवणे, मैदानी खेळ, डिजिटल डिटॉक्स यांसारख्या उपायांची अंमलबजावणी केली पाहिजे. गरज भासल्यास मानसोपचार तज्ञांची मदत घेणेही आवश्यक ठरते.
परदेशात मोबाइल वापरावर निर्बंध
चीनसारख्या देशाने लहान मुलांच्या मोबाइल वापरावर निर्बंध घातले आहेत. भारतातही अशा कठोर पावलं उचलण्याची मागणी सुज्ञ पालकवर्ग करत आहे. इंटरनेट जरी जग जवळ आणत असलं, तरी त्यातून येणारे धोके ओळखून पालकांनी सजग राहणे आणि मुलांच्या मोबाइल वापरावर कडक नियंत्रण ठेवणे ही काळाची गरज ठरली आहे. मोबाइलचा वापर पूर्णतः थांबवता येणार नाही, पण तो मर्यादित आणि सजगतेने केला तरच नव्या पिढीचं भविष्य वाचवता येईल!
मोबाइल ही काळाची गरज असली आहे. मात्र त्याचा कसा आणि किती वापर मुलांना करायला द्यावा हे पालकांच्या हातात असते. लहान मुले मोबाइलच्या आहारी गेली आहेत याला कारणीभूत पालकच आहेत. लहान मुलगा जेवत नसला की त्याच्या हातात मोबाइल दिला जातो. अगदी घरातील सर्वजण जेवण करीत असतानाही पालक मुलांच्या समोर पालक मोबाइल बघतात. मग लहान मुलेही पालकांचे अनुकरण करतात. केवळ पालकांनी नव्हे तर शाळेतील शिक्षकांनीही मोबाइलच्या अतिवापराबाबत मुलांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.
– डॉ. धनंजय अष्टुरकर, मानसोपचार तज्ज्ञ, निगडी
मोबालइचा अतिवापर चिंता वाढवतो.
शैक्षणिक प्रगतीवर परिणाम दिसतो.
ऑनलाइन गेम्समुळे आर्थिक फसवणूक.
मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
डोळ्यांवर ताण, झोपेचा त्रास.
कुटुंबीयांपासून दूर जाण्याची भीती.
वेळेचे नियोजन आणि मर्यादा गरजेच्या.





