Ravindra Dhangekar : ‘तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का’; रवींद्र धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
Ravindra Dhangekar : चंद्रकांत पाटील यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना धंगेकर यांनी त्यांच्या वक्तव्यांवरही नाराजी व्यक्त केली.

Ravindra Dhangekar : कोल्हापूरच्या राजकारणात सध्या सतेज पाटील आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण चांगलचं तापलं आहे. सतेज पाटील यांच्या संपत्तीवरून चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर आता माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही चंद्रकांत पाटीलांच्या टीकेचा खरपुस समाचार घेतला.
‘सतेज पाटील यांचे वडील डी. वाय. पाटील स्कूटरवर फिरायचे, हे ठीक आहे. पण महाराष्ट्राने तुमची परिस्थितीही पाहिली आहे. तुम्ही शबनमची झोळी घेऊन हॉटेलबाहेर उभे राहायचात. कोणीतरी हॉटेलमध्ये नेऊन चहा पाजतंय का, याची वाट पाहायचात. तुमची परिस्थितीही या महाराष्ट्राने पाहिली आहे ना? तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का?’ असा खोचक सवाल रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना केला.
‘सत्तेची मस्ती करू नका, सत्ता कायमस्वरूपी नसते’
चंद्रकांत पाटील यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना धंगेकर यांनी त्यांच्या वक्तव्यांवरही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, चंद्रकांत दादांचं भाषण ऐकलं असून, सध्या सुरू असलेला प्रकार नळावरच्या भांडणासारखा वाटत आहे. ‘मी हे करेन, ते करेन’, अशा प्रकारची भाषा वापरून दमदाटी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सत्ता कोणाचीही कायमस्वरूपी नसते. सत्ता ही कोणाची मांडलिक नाही आणि ती कोणाच्या दारात कायमस्वरूपी थांबत नाही. आज एका ठिकाणी असलेली सत्ता उद्या दुसरीकडे जाऊ शकते, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं, असा इशाराही धंगेकर यांनी दिला.
चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांवर काय केली होती टीका?
चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले होते. ‘बंटी पाटील, तू बंटीच राहिलास, कधी बंटी साहेब झालाच नाहीस. तुमच्या प्रॉपर्टीत एवढी वाढ कशी झाली? बंटी पाटलांना त्यांच्या कुटुंबातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हायचं आहे. एकेकाळी त्यांचे वडील डी. वाय. पाटील स्कूटरवरून फिरायचे. मग आता एवढी संपत्ती आली कुठून?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
तसंच, गोकुळ दूध संघाची सत्ता सतेज पाटील यांना मलई खाण्यासाठी हवी असल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
सतेज पाटलांचंही चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना सतेज पाटील यांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. ‘चंद्रकांत पाटील, आता तुमचाही काचेचा बंगला आहे. सरकारी यंत्रणेत राहून धमक्या देऊ नका. मला संपवतो, उद्ध्वस्त करतो, असं सांगण्यापेक्षा मैदानात या. विधानसभेला एकमेकांच्या विरोधात लढूया,’ असं खुलं आव्हान सतेज पाटील यांनी दिलं होतं.





