तुम्ही यात आहात का? महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांचा NSE वर दबदबा…12 कोटींमध्ये मोठा वाटा

नवी दिल्ली – जानेवारी महिन्यापासून भारतीय शेअर बाजारामध्ये कमालीची अस्थिरता आहे. जागतिक पातळीवरील भूराजकीय तणाव आणि व्यापार युद्धामुळे भारतीय शेअर बाजारांनी या कालावधीत नकारात्मक परतावा दिला आहे. मात्र तरीही शेअर बाजारात गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांची संख्या वेगाने वाढत आहे. आता राष्ट्रीय शेअर बाजारावर म्हणजे एनएसईवर गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांची संख्या 12 कोटींवर गेली आहे.
विशेष म्हणजे गेल्या आठ महिन्यात गुंतवणूकदारांची संख्या तब्बल एक कोटीने वाढली असल्याचे सांगण्यात आले. ही आकडेवारी 23 सप्टेंबर रोजी संकलित करण्यात आली असून एनएसईवर गुंतवणूक करणार्या एकूण गुंतवणूकदारांमध्ये महिलांचे प्रमाण 25% आहे. म्हणजे चार गुंतवणूकदारांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. जानेवारी महिन्यात गुंतवणूकदारांची संख्या 11 कोटी होती.
राष्ट्रीय शेअर बाजार सुरू झाल्यानंतर पहिले एक कोटी गुंतवणूकदार होण्यास 14 वर्षाचा कालावधी लागला. नंतर सात वर्षात पुढील एक कोटी गुंतवणूकदार आले. त्यानंतर केवळ साडेतीन वर्षातच आणखी एक कोटी गुंतवणूकदार आले. आता आठ महिन्यातच गुंतवणूकदारांची संख्या एक कोटीने वाढली आहे. यावरून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याबाबत गुंतवणूकदारांच्या मनात किती विश्वास वाढला आहे याचा अंदाज येतो.
सुरुवातीला गुंतवणूकदारांची संख्या 4 कोटी होण्यास 25 वर्षाचा कालावधी लागला. तर आता केवळ आठ महिन्यांत एक कोटी गुंतवणूकदार वाढले आहेत. गुंतवणूकदारांच्या संख्येत महाराष्ट्र आणि इतर दोन राज्य आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची संख्या 1.9 कोटी आहे. उत्तर प्रदेशातील गुंतवणूकदारांची संख्या 1.4 कोटी आणि गुजरात मधील गुंतवणूकदारांची संख्या 1.3 कोटी इतकी आहे.
डिजिटायझेशनचा परिणाम
गेल्या काही वर्षांत डिजिटायझेशन वाढले आहे. त्यामुळे तरुण वर्ग या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करीत आहे. त्याचबरोबर या कालावधीत मध्यम वर्गाचा विस्तार झाल्यामुळे या वर्गातील लोक गुंतवणुकीसाठी शेअर बाजाराचा वापर करीत आहेत. पाच वर्षांपूर्वी गुंतवणूकदारांचे सर्वसाधारण वय 38 होते ते आता ते 33 वर्षांवर आले आहे. म्हणजे तरुण लोक या क्षेत्रात जास्त सक्रिय झाले आहेत.





