वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली गावची लोकसंख्या जवळपास साडेतीन लाखांच्या आसपास पोहोचली असून, या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी वाघोलीत नवीन पोलीस ठाणे व्हावे, अशी मागणी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व स्थानिक लोकप्रतिनिधींनी मंत्रालय स्तरावर केली होती. या मागणीला शासनाने मान्यता दिली असून लवकरच या पोलीस ठाण्याची निर्मिती होणार असल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नवीन पोलीस ठाणे वाघोलीत व्हावे ही मागणी ग्रामपंचायतचे आजी-माजी पदाधिकारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील केली होती. वाघोलीचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, पुणे जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव, यांनी आमदार राहुल कुल, आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. नवीन पोलीस ठाण्यासाठी जागा देण्याचा प्रस्तावदेखील ग्रामपंचायतने दिला होता. वाघोली नवीन पोलीस ठाणे व्हावे यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल तत्कालीन पोलीस आयुक्त यांच्या हस्ते माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, महेंद्र भाडळे यांचा सत्कार करण्यात आला होता. वाघोली मध्ये नव्याने पोलीस ठाणे उभे राहिले जात असल्याने नागरिकांनी राज्य शासनाचे आभार मानले आहे. लवकरच पोलीस ठाण्याची उभारणी व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.