Vikas Lawande: अटकेची टांगती तलवार टळली! विकास लवांडे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर
Vikas Lawande: भारतीय न्याय संहितेच्या गंभीर कलमांखाली वाघोलीत गुन्हा; तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर न्यायालयाने दिले संरक्षण.

Vikas Lawande – वाघोली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास सदाशिव लवांडे (वय 54, रा. पुणे) यांना जिल्हा न्यायालयाने 20 मे 2026 पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. विकास लवांडे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 196(1)(अ), 299 व 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी फौजदारी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी या अर्जावर सुनावणी घेतली. अर्जदाराच्या वतीने अॅड. हर्षवर्धन मिलिंद पवार यांनी बाजू मांडताना संबंधित गुन्हा खोटा व प्रतिशोधाच्या हेतूने दाखल करण्यात आल्याचा दावा केला. तसेच यापूर्वी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात स्वतःवर पिस्तूल रोखून धमकावल्याची व अंगावर केमिकलयुक्त वंगण टाकल्याची तक्रार दिल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
युक्तिवादानंतर न्यायालयाने लवांडे यांना तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर अंतरिम संरक्षण दिले. तसेच संबंधित पोलिसांना नोटीस बजावून अंतरिम संरक्षण पुढे का सुरू ठेवू नये, याबाबत म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य अर्जावरील पुढील सुनावणी 20 मे 2026 रोजी होणार आहे. दरम्यान, न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून कायदेशीर प्रक्रियेस सहकार्य करणार असल्याचे विकास लवांडे यांनी सांगितले.




