nagar | पोलीस व महसूल प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक

शिर्डी, (प्रतिनिधी)- शिर्डी शहरामध्ये पाच वाजेपर्यंत जवळपास ५५ टक्क्यांहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त अतिशय चोख ठेवला होता. निवडणूक अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांनी महसूलच्या कर्मचाऱ्यांना केलेले मार्गदर्शन व नियोजनामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पाडण्यासाठी मोठी मदत झाली. मतदान केंद्रावर पाण्याची व्यवस्था, दिव्यांगांसाठी व वृद्धांसाठी व्हील चेयर इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
पोलीस प्रशासनावर बंदोबस्ताचा ताण पडू नये, याकरिता होमगार्ड तसेच शालेय स्काऊटचे विद्यार्थी सुध्दा आपले काम चोखपणे पार पाडताना दिसले. अनेक कर्मचारी हे मतदारांना योग्य ती माहिती समजावून सांगून मतदारांना मतदान करण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून मार्गदर्शन करत होते.
शिर्डी मतदारसंघात महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे व महायुतीचे उमेदवार खा.सदशिव लोखंडे यांनी सहपरिवार आपल्या मतदानाचा हक्क बजावला. एकंदरीतच शिर्डीतील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दोनही उमेदवारांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस व महसूल प्रशासन यांचे आभार मानून धन्यवाद दिले.




