पुणे – हिमाचल प्रदेश येथील सिमला सफरचंदांचा हंगाम सुरू आहे. चवीला गोड असणाऱ्या सिमला सफरचंदांना श्रावणातील उपवासांमुळे मागणी वाढली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलोची विक्री 100 ते 200 रुपयाने होत आहे.
आकर्षक वेष्टन आणि चकचकीतपणामुळे परदेशी सफरचंद लक्ष वेधून घेतात. परदेशी सफरचंदांची शीतगृहात साठवणूक करण्यात येते. मात्र, या सफरचंदांच्या तुलनेत देशी सफरचंद ताजी असतात. दिल्लीतील मुख्य फळबाजारात सध्या सिमल्याहून दररोज 300ते 400 गाड्या सफरचंदांची आवक होत आहे, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील व्यापारी सुयोग झेंडे यांनी सांगितले.
श्रावण महिन्यात सिमला सफरचंदांची आवक वाढते. मार्केट यार्डमध्ये सिमला सफरचंदांची दररोज 10 ते 12 गाड्यांमधून सात ते आठ हजार खोकी एवढी आवक होत आहे. घाऊक बाजारात सिमला सफरचंदाच्या 26 ते 27 किलोच्या पेटीला प्रतवारीनुसार 2500 ते 2600 रुपये असा भाव मिळाला. हिमाचल प्रदेशातील सफरचंदाच्या हंगामात पहिल्या टप्प्यात हिमाचल प्रदेशातील कुलू येथून आवक होते. त्यानंतर सिमला सफरचंदांची आवक सुरू होते. हिमाचल प्रदेशातील सफरचंदांच्या हंगामात किन्नोर येथील सफरचंदांची प्रतवारी चांगली असते.
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातून किनोर सफरचंदांची आवक होते. ऑक्टोबरपर्यंत हिमाचल प्रदेशातील सफरचंदांचा हंगाम सुरू राहतो. त्यानंतर काश्मीरमधील सफरचंदांची आवक सुरू होते. जानेवारीपर्यंत देशी सफरचंदांची आवक बाजारात सुरू राहते, असेही झेंडे यांनी सांगितले.