Appleचा मोठा निर्णय: ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाला न जुमानता iPhone 17 चे संपूर्ण उत्पादन भारतात

नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात 25% आयात शुक लावले आहे. आणखी 25% आयात शुल्क पुढील आठवड्यापासून लागू होणार आहे. मात्र तरीही अमेरिकेतील अॅपल कंपनी आपल्या आयफोनचे उत्पादन भारतात वाढविणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आयफोनचे आगामी आयफोन 17 मॉडेल पूर्णपणे भारतात तयार करण्यात येणार आहे. या अगोदर ही कंपनी भारतामध्ये अंशतः उत्पादन करीत होती. आता आयफोन 17 भारतात भारतीय बाजारपेठेबरोबरच जागतिक बाजारपेठेसाठी तयार केला जाणार आहे.
अगोदर काही फोनचे उत्पादन चीनमध्ये आणि काही फोनचे उत्पादन भारतामध्ये होत होते. मात्र आता सर्वच्या सर्व फोनचे उत्पादन भारतात करण्याचा कंपनीचा विचार असल्याचे सांगितले जाते. भारतात आयफोन तयार करणार्या पाच कंपन्या आहेत. त्या सर्वांमध्ये हे उत्पादन होणार आहे. हे उत्पादन भारतासह जागतिक बाजारपेठेसाठी पुरेसे असेल.
प्रथमच आयफोनच्या सर्व मॉडेलचे उत्पादन भारतात होणार आहे असे जागतिक वृत्तसंस्थांनी सूत्राचा हवाला देऊन सांगितले. दोन वर्षापासून अॅपल कंपनी चीनमध्ये होणारे उत्पादन भारतात हलवत आहे. अमेरिका चीनवर विसंबून राहणे कमी करणार आहे. त्याऐवजी पर्यायी बाजारपेठ म्हणून भारताला तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.
टाटा समूहाचा आयफोन निर्मितीचा तामिळनाडूत प्रकल्प आहे. तर फॉक्स्वान कंपनीचा प्रकल्प बंगळुरूजवळ आहे. या दोन प्रकल्पातून जास्त उत्पादन होत असल्याचे सांगितले जाते. यावर्षी एप्रिल ते जुलै या कालावधीत आयफोन कंपनीने 7.5 अब्ज डॉलरचे फोन निर्यात केले. गेल्या संपूर्ण वर्षांमध्ये 17 अब्ज डॉलरचे फोन निर्यात केले होते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपल कंपनीला अमेरिकेतच फोन तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र अॅपल कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. भारतातून अमेरिकेला फोन निर्यात केल्यामुळे अॅपल कंपनीच्या नफ्यावर 1.1 अब्ज डॉलरचा परिणाम होण्याची शक्यता आहे.





