Apple: अॅपलची उत्पादने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतात अॅपलची रिटर्न आणि रिफंड पॉलिसी अनेक ग्राहकांना धक्का देणारी ठरत आहे. कारण अमेरिकेत ग्राहकांना १४ दिवसांच्या आत उत्पादन परत करण्याची किंवा बदलण्याची सुविधा मिळते, पण भारतात मात्र अॅपलची पॉलिसी पूर्णपणे वेगळी आहे. अॅपलने भारतात सुरुवातीला अधिकृत ऑनलाइन स्टोअर सुरू केले होते. भारतीय ग्राहक थेट कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करतात का, याची चाचणी घेण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता. हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर अॅपलने मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये स्वतःचे रिटेल स्टोअर्स सुरू केले. काही शहरांमध्ये तर कंपनीची दोन-दोन स्टोअर्सही आहेत. Apple मात्र, अॅपल इंडिया स्टोअरमधून उत्पादन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची अट आहे. कंपनीच्या धोरणानुसार, भारतात अॅपल स्टोअरमधून घेतलेले उत्पादन ग्राहक परत करू शकत नाहीत. तसेच, फक्त आवडले नाही किंवा मन बदलले म्हणून उत्पादन एक्सचेंज करण्याची सुविधाही उपलब्ध नाही. म्हणजेच, जर तुम्ही आयफोन, मॅकबुक किंवा इतर कोणतेही अॅपल उत्पादन विकत घेतले आणि ते व्यवस्थित काम करत असले, तरी ते परत करून पैसे मिळवता येणार नाहीत. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी नीट विचार करण्याची गरज आहे. Apple Apple: अमेरिकेत १४ दिवसांत रिटर्न, पण भारतात ‘नो रिफंड’; अॅपलच्या नियमांवर ग्राहक नाराज तथापि, उत्पादनात काही तांत्रिक बिघाड असल्यास कंपनीकडून मदत मिळू शकते. जर उत्पादन वॉरंटीमध्ये असेल किंवा ग्राहकाने अॅपल केअर प्लस सेवा घेतली असेल, तर अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये कमी खर्चात दुरुस्ती करून दिली जाते. काही विशेष परिस्थितीत कंपनी खराब उत्पादन बदलूनही देते. अमेरिकेतील नियम मात्र याच्या पूर्णपणे उलट आहेत. अमेरिकेत ग्राहकांना उत्पादन मिळाल्यानंतर १४ दिवसांच्या आत ते परत करण्याची किंवा एक्सचेंज करण्याची सुविधा दिली जाते. ग्राहकाकडे खरेदीची पावती असल्यास प्रक्रिया आणखी सोपी होते. भारत आणि अमेरिकेत वेगवेगळे नियम का आहेत, याबाबत अॅपलकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, ग्राहकांची मानसिकता, बाजारपेठेचा आकार आणि व्यवसायाचे धोरण यामुळे हे बदल असू शकतात, असे मानले जाते. तरीही भारतीय ग्राहकांमध्ये या धोरणाबद्दल नाराजी दिसत आहे. अनेकांचे मत आहे की, भारतातही अमेरिकेसारखी रिटर्न आणि रिफंड सुविधा सुरू करायला हवी. कारण महागडी उत्पादने खरेदी करताना ग्राहकांना अधिक सुरक्षितता आणि पर्याय मिळणे आवश्यक आहे.