रूपगंध : मल्टिटास्किंग

स्वयंपाक करताना उद्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टींची तयारी, फोनवर बोलताना शॉपिंग लिस्ट करणं किंवा टीव्ही पाहताना उद्याची भाजी निवडून ठेवणं या गोष्टी कोणत्याही घरात बायका करत असतात. ऑफिसमध्येही एकावेळी दोन वेगवेगळी कामं करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. स्त्रिया मल्टिटास्किंग करण्यात पुढे असतात. खरं तर त्यांच्याकडून याची अपेक्षाच केली जाते, पण हे करणं त्यांच्या मनावर अतिरिक्त ताण तर घालत नाही ना? की ही आजच्या फास्ट लाइफस्टाइलची गरज आहे?
मल्टिटास्किंग म्हटलं की पुलंचा “नारायण’ आठवतो, “वन मॅन आर्मी’ असल्यासारखा तो सगळ्या आघाड्यांवर लढत असे. त्याच्याशिवाय लग्नातलं एकही पान हलत नसे. अशी माणसं आपल्यालाही भेटत असतात. आजकाल तर अनेकांना हा “नारायणी अवतार’ धारण करावा लागतो कारण त्यांच्याकडे रात्र थोडी आणि सोंग फार असतात! त्यामुळे एकावेळी नीटपणे एकच काम करत आहोत असं चित्र फारसं दिसतच नाही. एकाबरोबर दुसरंही काम कसं तेवढ्याच वेळात होईल याची तयारी प्रत्येकजण करत असतो. त्यात काहीजणांना हे जमतं तर काही शर्थीचे प्रयत्न करतात. स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर घर आणि ऑफिस अशी दुहेरी कसरत करावी लागणाऱ्या अनेक स्त्रिया असं मल्टिटास्किंग सततच करत असतात.
काही वर्षांपूर्वी मुलीला कोणकोणत्या गोष्टी करता येतात याची लग्नाआधी चाचणी घ्यायचे. त्यात जिला सगळं काही येतं तिला पसंती जास्त असायची. आता त्या वधुपरीक्षाही गेल्या आणि ती कामंही. पण आजकाल मुलीला बरीच कामं एकाचवेळी करता येतात का याचा मात्र अंदाज घेतला जातो हं! ही काळाची गरजच आहे म्हणा ना, तिला घराबरोबच बाहेरची कामं करता येतात का? ती आर्थिकदृष्ट्या नुसती कमावणारी नाही तर तिला गुंतवणुकीचंही काही ज्ञान आहे का? ती मुलांच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये पेरेंट मिटींगला जाताना तिथल्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकते का? ती घरात ऍरेंज केलेली पार्टी योग्य प्रकारे पार पाडू शकते का?
ती ऑनलाइन काही गोष्टी ऑर्डर करू शकते का? ती ऑनलाइन बिलं भरू शकते का? इतकंच काय आजकाल ती ड्रायव्हिंग करताना जीपीएसवर तो ऍड्रेस शोधू शकते का, असं बरंच काही महत्त्वाचं ठरू लागलं आहे. ही गोष्ट केवळ स्त्रियांनाच लागू होत नाही ती प्रत्येकालाच लागू होते पण पहिल्यापासूनच महिलांकडून तिने एकाचवेळी अनेक ठिकाणी सारखंच लक्ष द्यावं आणि बरीच कामं योग्य प्रकारे पूर्ण करावीत अशी अपेक्षा केली गेली आहे. त्यामुळे मल्टिटास्किंग असणं ही आजच्या सुपरवुमनची तर गरजच होऊन बसली आहे. हे एक वैशिष्ट मानलं जाऊ लागलं आहे. त्यात तुम्ही कमी पडत असाल तर काहीतरी चुकतंय असंही मानलं जातंय. मल्टिटास्किंग असणं ही आजच्या जमान्याची गरज तर आहेच पण ती आजच्या जगण्याची गरज होऊन बसली आहे त्याला काय करायचं? आणि हा सगळा शो मॅनेज करण्याची मुख्य जबाबदारी घरातल्या गृहिणीवर येत असते.
आजकाल कोणतीही गोष्ट करताना त्याचबरोबर आणखी किती गोष्टी करता येत आहेत याची चाचपणी करावी लागते. सकाळी आवरताना कामवाली बाईच्या कामांची यादी फ्रिजवर लावायची जबाबदारी असो की प्रवास करताना ऑफिसमधल्या पुढच्या कामांची रांग लावणं असो तिच्याकडून या गोष्टी अगदी सहज अपेक्षित असतात. बरेचदा त्यात त्यांना यशही येतं. बऱ्याचजणी हा शो चांगला मॅनेज करतात. घरचं आणि ऑफिसचं काम अगदी चोख सांभाळतात, मुलांच्या अभ्यासावर, त्यांच्या इतर ऍक्टिव्हिटीजवर त्यांचं योग्य लक्ष असतं. घरात होणाऱ्या पार्ट्यांपासून ते पाहुण्यांच्या आदरातिथ्यापर्यंत त्या बऱ्याच गोष्टी करत असतात, पण या सगळ्याचा त्यांच्या शारीरिक क्षमतेवर किंवा मानसिक क्षमतेवरही परिणाम होत असतो का? मल्टिटास्किंग ही आजची गरज खरी पण त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर तर होणार नाही ना याची काळजीही घेतली पाहिजे.
दोन कामं एकाचवेळी सारख्याच ताकदीने किंवा लक्षपूर्वक करणं ही खरंच कौशल्याची गोष्ट आहे. त्यासाठी मेंदू आणि शारीरिक हालचाली यांचं योग्य संतुलन असावं लागतं. त्यासाठी मेंदू एकाचवेळी दोन वेगवेगळ्या कामात सारखाच चालू असावा लागतो. हे करताना त्यावर अतिरिक्त ताण येणार हे तर उघडच आहे. तो ताण नंतर शरीरावरही जाणवणार. याचा परिणाम नंतर कुठेतरी तुमच्या शरीरावर किंवा मनावर होत असतो. लक्षात न राहणं, ठराविक गोष्टीतील रस कमी होणं किंवा काहीच न करावंसं वाटणं या त्यातल्या काही सामान्य लक्षणांपैकी एक आहेत. वर्षानुवर्षे जेव्हा मेंदू आणि शरीर एकाच लयीत काम करत असतात तेव्हा त्यांना त्याची सवय होते खरी पण शेवटी ही दोन्हीही यंत्रच आहेत. त्यांना कधीतरी आराम किंवा नव्या कामाचा बदल हा दिलाच पाहिजे.
आजकाल अगदी लहानपणापासूनच आपण मुलांना मल्टिटास्किंग बनवत असतो. त्यांनी अभ्यासाप्रमाणेच इतरही एखादी कला शिकावी किंवा व्यवहारज्ञानही वाढवावं म्हणून पालकांचे प्रयत्न सुरू असतात. मल्टिटास्किंग करण्याची त्यांची क्षमता त्यामुळे वाढत जाते. लहानपणीच शाळेसाठी तयार होताना कितीतरी गोष्टी एकावेळी करण्याची शिकवण आपण त्यांना देतो. त्यामुळे मेंदूला एकाचवेळी वेगवेगळ्या आज्ञा पाळायला लावण्याची सवय त्यांना होते. त्यामुळे नंतर ही मुलं टीव्ही पाहात असताना अभ्यास करायला किंवा फोनवर बोलत असताना प्रोजेक्ट पूर्ण करायला आपोआप शिकतात. संगीत ऐकताना बाकीची कामं करणं हे आपणही करतच असतो. त्याचवेळी मेंदू संगीताचा आस्वाद घेत असतो तर हात अन्य कामं करत असतात. नंतर शरीराला आणि मनाला ती सवय लागते. सुरुवातीला त्याचा त्रास होत नाही उलट अनेक कामं एकाचवेळी करत असल्याने हुरूप वाढतो.
आपली जीवनशैलीच अशी होत चालली आहे की आपल्याला मल्टिटास्किंग असल्याशिवाय पर्याय राहात नाही. पाच दिवस काम आणि दोन दिवस आठवड्याभरातील राहिलेली कामं, पुढची तयारी, खरेदी, मनोरंजन, मित्र किंवा नातेवाईंकांना भेटणं अशा अनेक डगरींवर हात ठेवावे लागतात. त्यामुळे कमी वेळात अनेक कामं उरकण्याची सवय लागते. मात्र, एक टप्पा झाला की यातली यांत्रिकता जाणवू लागते. म्हणूनच आपलं यंत्र न होऊ देता हे मल्टिटास्किंग कसं एन्जॉय करता येईल याकडे लक्ष द्यावं लागेल.
यातला सोपा पर्याय म्हणजे आपलं शरीर हे यंत्र नाही त्याला मधूनच विश्रांतीची, मनोरंजनाची किंवा बदलाची गरज आहे हे आधी जाणूून घेतलं पाहिजे आणि ते मनाला पटवलंही पाहिजे. सतत कामात गुंतून राहणं ही चांगली गोष्ट असली तरी विश्रांतीलाही महत्त्व दिलं पाहिजे. विशेषत: जेव्हा सकाळचा बराच वेळ अनेक कामं पटापट निपटून टाकण्यासाठी खर्च होतो तेव्हा नंतर काही वेळ शांतपणे घालवला पाहिजे. एकावेळी एक काम पण लक्षपूर्वक करण्यावर भर दिला पाहिजे. मल्टिटास्किंग करावंच लागत असेल तर ज्यात मेंदू आणि शारीरिक हालचाली यांची विषम विभागणी असेल अशी कामं एकत्र करायला हवीत. म्हणजे जिथे मेंदूचं काम सुरू असेल तेव्हा हाताला सहज जमेल असं काम करणं श्रेयस्कर आहे. तेव्हा मल्टिटास्किंग करा पण त्याचा तुमच्या मनावर आणि शरीरावरही अतिरिक्त ताण येऊन सगळाच शो बंद पडणार नाही याची काळजीही अवश्य घ्या!
– राधिका बिवलकर





