Awarapan 2 trailer : प्रेमासाठी काहीपण! इम्रान हाश्मीच्या नव्या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
Awarapan 2 trailer : सुरुवातीलाच इम्रान हाश्मी आणि शबाना आझमींची झलक दाखवण्यात आली आहे. 'तेरा मेरा रिश्ता पुराना' हे लोकप्रिय गाणं ट्रेलरमधून ऐकायला मिळतं.

Awarapan 2 trailer : अभिनेता इम्रान हाश्मीच्या बहुप्रतीक्षित ‘अवारापन २’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये अॅक्शन, भावनिक संवाद आणि थरारक दृश्यांची मेजवानी पाहायला मिळत असून, चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
स्पेशल फिल्म्सने सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरसोबत “तुम्ही त्याचे दुःख अनुभवले आहे, आता त्याचा राग अनुभवा. शिवम पंडितच्या दुसऱ्या अध्यायाची सुरुवात,” असे कॅप्शन दिले आहे. ‘अवारापन २’ हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या आवारापनचा सिक्वेल आहे. ( Awarapan 2 trailer)
ट्रेलरची सुरुवात एका रहस्यमय आणि तणावपूर्ण दृश्याने होते. सुरुवातीलाच इम्रान हाश्मी आणि शबाना आझमींची झलक दाखवण्यात आली आहे. ‘तेरा मेरा रिश्ता पुराना’ हे लोकप्रिय गाणं ट्रेलरमधून ऐकायला मिळतं. ( Awarapan 2 trailer)
ट्रेलरमध्ये दमदार अॅक्शन आणि काही हिंसक प्रसंगांची रेलचेल असून, अभिनेत्री दिशा पटानीचीही झलक पाहायला मिळते. चित्रपटाची नेमकी कथा ट्रेलरमधून स्पष्ट होत नसली तरी कोणाला तरी वाचवण्यासाठी इम्रान (शिवम पंडित) सगळ्यांना भिडतो, असा अंदाज लावला जात आहे. (Awarapan 2 trailer)
ट्रेलरच्या शेवटी हातात बंदूक घेतलेला इम्रान हाश्मी “तुम्ही एक-एक करून मरणार की सगळे एकाच वेळी?” असा प्रश्न विचारताना दिसतो. या एका संवादानेच ट्रेलरचा थरार शिगेला पोहोचतो. त्यामुळे आवारापन २ ची मोठी उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
‘अवारापन २’मध्ये इम्रान हाश्मी पुन्हा एकदा शिवम पंडितच्या लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत दिशा पटानी, शबाना आझमी, सुविंदर विकी, विजयंत कोहली, अनिरुद्ध रावल आणि अतुल कुमार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत मिथुन, जीत गांगुली, अमाल मलिक आणि अखिल सचदेवा यांनी दिले आहे.
दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. मात्र, निर्माते विशेष भट्ट आणि इम्रान हाश्मी यांनी एका लाईव्ह सेशनमध्ये या सर्व अफवा फेटाळून लावत चित्रपट ठरलेल्या नियोजित वेळेनुसार १४ ऑगस्ट २०२६ रोजीच प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट केले.
बटवारा १९४७ VS आवारापन २ (Awarapan 2 trailer)
विशेष भट्ट निर्मित, नितीन कक्कर दिग्दर्शित आणि बिलाल सिद्दीकी लिखित ‘अवारापन २’ला नुकतीच सेन्सॉर बोर्डाकडून ‘UA’ प्रमाणपत्र मिळाले आहे. काही दृश्यांमध्ये बदल करण्यात आला असून हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित होत असून सनी देओल आणि प्रीती झिंटा यांच्या ‘बटवारा १९४७’शी बॉक्स ऑफिसवर थेट टक्कर देणार आहे.





