Anuradha Paudwal: प्रसिद्ध गायिका ‘अनुराधा पौडवाल’ यांना २०२४चा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कार जाहीर !

Anuradha Paudwal | Lata Mangeshkar Award: प्रसिद्ध गायिका ‘अनुराधा पौडवाल’ यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२४ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारासोबतच नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार,
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार आणि बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा आज सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर आज करण्यात आले. संगीत आणि गायन क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पण केले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल दिला जाणारा भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना घोषित करण्यात आला आहे.
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कारासाठी मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुध्दीसागर यांना जाहीर झाला आहे. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरवचा पुरस्कार शुभदा दादरकर यांना जाहीर झाला आहे.
संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार २०२३ साठी शशिकला झुंबर सुक्रे यांच्या नावाची घोषणा झाली आहे तर २०२४ साठीचा पुरस्कार जनार्दन वायदंडे यांना जाहीर झाला आहे.
कोकणी कुटुंबात जन्म –
अनुराधा पौडवाल यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९५४ रोजी कर्नाटकातील उत्तर कन्नड कारवार येथे एका कोकणी कुटुंबात झाला. १९७३ मध्ये आलेल्या ‘अभिमान’ चित्रपटात त्यांनी पहिले गाणे गायले होते. अनुराधा पौडवाल यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. यामध्ये ‘आशिकी’, ‘राम लखन’, ‘साजन’, ‘दिल’, ‘दिल है की मानता नहीं’ आणि ‘बेटा’ सारख्या उत्कृष्ट चित्रपटांचा समावेश आहे.
पौडवाल यांची एकूण संपत्ती किती आहे?
अनुराधा पौडवाल यांच्या निव्वळ संपत्तीचा अंदाज बांधणे कठीण आहे. कारण ती अनेक घटकांवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, त्यांचे उत्पन्न, मालमत्ता, गुंतवणूक आणि खर्च.
प्लेबॅक रॉयल्टी, लाइव्ह शो, रेकॉर्डिंग, ब्रँड एंडोर्समेंट आणि इतर व्यावसायिक उपक्रम हे त्याच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती ५० ते १०० कोटी रुपयांपर्यंत असू शकते. त्या मुंबईतील खार येथे एका डुप्लेक्स घरात राहतात. त्यांना साधेपणाने जगणे आवडते.
पद्मश्रीने सन्मानित –
२०१७ मध्ये अनुराधा पौडवाल यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांना फिल्मफेअर पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
बॉलीवूड चित्रपटातच नाही तर भजन गायनातही आपल्या आवाजाने त्यांनी जगात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी आपल्या कारकिर्दीत गुजराती, पहाडी, कन्नड, तमिळ, मराठी, संस्कृत, बंगाली, तेलगू, उडिया, आसामी, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.





