बिताक्याच्या बितनगडावर आढळली पुरातन तोफ!

पुरातत्त्व विभागाच्या भूमिकेकडे लक्ष
ही तोफ शिवकालीन आहे की पेशवेकालीन, याची माहिती पुरातत्त्व विभागाचे अधिकारीच देऊ शकतील. यापूर्वी रतनगडावरही अशीच तोफ सापडली होती. ती तोफ सध्या नगर येथे आहे. विश्रामगडामुळे अकोले तालुक्यातील आढळा विभागाला ऐतिहासिक अनन्य साधारण महत्त्व आहे, असे गडकिल्ले अभ्यासक प्राचार्य शांताराम गजे म्हणाले.
अकोले – अकोले तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या बिताका येथील बितनगडाच्या बुरुजावर नुकतीच एक जुनी तोफ आढळून आली. दरम्यान ही तोफ शिवकालीन की पेशवेकालीन, याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही.
गड-किल्यांच्या अकोले तालुक्यातील बिताका येथील बितनगडाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. याच परिसरात पट्टा किल्ला म्हणजेच विश्रामगड आहे. या गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी वास्तव्य केल्याचे ऐतिहासिक दाखले उपलब्ध आहेत. बिताका हे अकोले तालुक्याच्या हद्दीतील शेवटचे गाव आहे. या गावापासून नाशिक जिल्ह्याची हद्द सुरू होते.
या गावातील बितनगडावर अनेक पांडवकालीन टाके असून, या टाक्यांचा वापर गुराखी जनावरांना पाणी पाजण्यासाठी करीत आहेत. या गडावर यापूर्वी ‘गडवाट’ या सामाजिक संस्थेने अनेकदा जाऊन या गडावर स्वच्छता मोहीम राबवली आहे. मात्र या गडावर अजूनही काही गाळाने बुजलेले टाके आहेत.गडावर अशाच एका टाक्यातून गाळ काढण्याचे काम सुरू असताना गावातील विठ्ठल पेढेकर, लालू पेढेकर, संतोष भांगरे, दशरथ साबळे, प्रकाश पेढेकर, सचिन पेढेकर, विष्णू पेढेकर या तरुणांना गंजलेल्या अवस्थेतील एक लोखंडी तोफ आढळून आली. या तोफेचे वजन 50 किलो पेक्षा अधिक असल्याचे या तरुणांनी सांगितले.
या तरुणांनी ही तोफ टाक्यातून बाजूला काढून पत्रकार अमोल शिर्के यांच्या माध्यमातून ही घटना नागरिकांपर्यंत पोहोचवली.दरम्यान ही तोफ सापडून बराच कालावधी उलटून गेला तरी पुरातव विभाग व अन्य प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे प्रशासनाला या ऐतिहासिक घटनेचे गांभीर्य नसल्याची चर्चा आहे.





