पुणे | कोंढव्यात दहशतवाद विरोधी कारवाई

पुणे,[प्रभात वृत्तसेवा] – कोंढव्यातील मिठानगरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) छापा टाकून बेकायदेशीर बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटरचा पर्दाफाश केला. गणेशोत्सवात शहरात संभाव्य घातपात घटनांच्या अनुषंगाने पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
एटीएसने डीओटीचे अधिकारी व शासकीय पंचांच्या समक्ष कारवाई करीत एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तर. पथकाने तब्बल ३ हजार ७८८ सीमकार्डसह वायफाय आणि सीमबॉक्स चालवण्याकरिता लागणार्या अँटिना तसेच लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला आहे.
नौशाद अहमद सिद्धीकी (वय 32, रा. कोंढवा) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएसच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेली माहिती अशी की, भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल गुप्तचर यंत्रणेला समजू नयेत यासाठी बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटरचा वापर केला जात होता.
याकरिता या सीमकार्डचा वापर केला जात होता. मीठानगर येथील एमए कॉम्प्लेक्स परिसरात हे टेलिफोन एक्सचेंज सेंटर चालवले जात होते. ताब्यात घेतलेल्या नौषादकडे चौकशी सुरू आहे.
बेकायदा टेलिफोन एक्सचेंज चालवून त्याने दूरसंचार विभाग आणि भारत सरकार आणि मोबाइल कंपन्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. सीमकार्ड कोठून आणले? त्याला कोणत्या वितरकाने हे सीमकार्ड पुरवले, येथील यंत्रणा कशी उभी केली?
याबाबतचे प्रशिक्षण कुठे घेतले? आर्थिक मदत कोणी केली? कोंढवा येथे जागा कोणी व कशी दिली? ताब्यात घेतलेल्या संशयित तरुणाची पार्श्वभूमी काय याबाबत कसून तपास केला जात आहे.
यापूर्वीही कोंढवा भागात अनेक वेळा दहशवाद विरोधी कारवाया करण्यात आल्या आहेत अनेक दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, नुकतेच ईसिसचे मोड्यूल देखील उघडकीस आले होते. त्याअनुषंगाने एटीएसने केलेली ही कारवाई महत्वाची मानली जात आहे.
तसास यंत्रणांच्या रडावर नौशाद होताच…
आरोपी नौशाद याच्यावर तपास यंत्रणांची आधीपासून नजर होती. तो काही महिन्यांपूर्वी राजस्थानला गेला होता. त्याला ठाणे पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली होती. त्याचा ताबा एटीएसकडून घेतला जाणार आहे.
त्याने राहत्या घरातच हा सर्व सेटअप तयार केला होता. राजस्थानला जाण्यापूर्वी त्याने हे सर्व साहित्य काढून घरातच ठेवले होते. एटीएसला याबाबत खबर्यामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार, कारवाई करण्यात आली.
दहशतवादी कृत्यास सहाय्य होईल, असे अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज सेंटर उद्ध्वस्त केल्याचे एटीएसने म्हटले आहे. परिसरात अशा प्रकारचे अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज आढळून आल्यास नागरिकानी जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा एटीएसशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





