व्यसनविरोधी लोकचळवळ आवश्यक

विशेष : डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी
31 मे हा दिवस “जागतिक तंबाखू विरोधी दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र सरकारने 1 ऑगस्ट 2002 पासून तंबाखू, गुटखा व पानमसाल्यावर बंदी घातली. या बंदीचा परिणाम कितपत झाला? राज्य आणि पर्यायाने देश व्यसनमुक्त होण्यासाठी काय केले पाहिजे? त्याबाबत…
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली, त्यात दारूचीही दुकाने होती, परंतु 18 मे पासून परवानाधारकांना दारू विक्रीची मुभा आणि घरपोच डिलिव्हरी करण्याने सरकारला नेमके काय साध्य करायचे आहे? महाराष्ट्र सरकारने 1 ऑगस्ट 2002 पासून राज्यात पाच(च) वर्षांसाठी तंबाखू, गुटखा व पानमसाल्यावर बंदी घातली. हे त्यावेळच्या सरकारचे स्वागतार्ह पाऊल होते, खरे पण काय त्यामुळे तंबाखू बंद झाली का गुटखा बंद झाला? आता या बंदीमागे महसुलाचे कारणही होतं, पण तितकाच महाराष्ट्रातील स्वयंसेवी संघटनांचा दबावही होता, पण या बंदीचा राज्यात तितकासा परिणाम झाला नाही.
सरकारने तंबाखू किंवा गुटखा सेवनावर कोणतीही बंदी घातलेली नाही, तसेच कोणत्याही कडक शिक्षेची तरतूद न केल्याने बाहेरून चोरून तंबाखू/गुटखा आणून खाण्याचे प्रकार राजरोस सुरू आहेत. केरळ, गोव्यासारख्या राज्यांनी तंबाखूजन्य पदार्थांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. पण आमच्या शासनाने पाचच वर्षांसाठी ही बंदी जाहीर केलेली होती. केंद्र शासनाने करोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सर्व दारूची दुकाने तसेच तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारी दुकाने कायमपणे बंद ठेवावीत, घरपोच दारू/तंबाखू, गुटखा पुरविण्याचे काम बंद ठेवल्यासच यावर आळा बसू शकतो आणि हे सरकारच करू शकते. हे मागील दोन महिने दारू दुकानासकट सर्व दुकाने बंद ठेवून सिद्ध करून दाखविले आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रसारासाठी उत्पादक कंपन्यांनी वेगवेगळ्या शकली लढविल्या आहेत. ज्याचे लोण ग्रामीण भागातही वेगाने पसरलेले आहे. मोठमोठ्या बक्षिसांची आमिषं दाखवून कुमारवर्गाला भुरळ पाडून त्यांना या घातक व्यसनांच्या मायाजालात अडकवले आहे.
सद्य:स्थितीला सर्वात जास्त मृत्यू केवळ तंबाखूमुळेच होतात व त्यातली मनाला दुःख देणारी बाब म्हणजे ते सर्व टाळण्याजोगे आहे. माणसाचा जीव घेणारे इतर घटक म्हणजे एड्स, प्रदूषण, कोकेन, हेरॉइनसारखे अंमलीपदार्थ, खून, आग, अपघात, आत्महत्या इत्यादी, या साऱ्या कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या एकत्र करूनसुद्धा त्याच्यापेक्षा जास्त बळी केवळ तंबाखूचे असतात. हे आज जागतिक आकडेवारीवरून सिद्ध झालेले आहे. साऱ्या जगात तंबाखूचे सेवन केल्यामुळे दरवर्षी लाखो लोक मरण पावतात.
जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. हिरोशी नाकाजीना यांच्या म्हणण्यानुसार, वरील मृत्यूंपैकी पंधरा लाख मृत्यू भर तारुण्यात होतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे अपरिमित नुकसान होते. तंबाखू सेवनाचे सत्र अव्याहतपणे असेच वाढत राहिले, तर येत्या काही दशकांत तंबाखू सेवनाने होणाऱ्या अकाली मृत्यूंची संख्या दरवर्षी एक कोटींच्यावर जाईल, अशी साधारण भीती डब्ल्यूएचओ (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन)ने व्यक्त केली आहे. अमेरिकेत दरवर्षी साडेतीन लाख लोक निव्वळ तंबाखूचे बळी ठरतात. टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या अंदाजानुसार भारतात दरवर्षी बिडी, सिगारेट, हुक्का, चुना, तंबाखू, मावा, गुटखा सेवनामुळे होणाऱ्या रोगांनी मृत्यूचा आकडा दहा लाखांपर्यंत असावा.
ही तंबाखू भट्टीमध्ये भाजण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. परिणामी, प्रदूषणातही नित्य वाढ होत आहे. तंबाखू व्यसनाचा अतिरेक झाला की, पाठोपाठ त्या देशात हृदयविकार व कॅन्सरने मरणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते, हा काही योगायोग नसतो. तंबाखू उद्योगाचा खप वाढविण्याच्या आक्रमक जाहिरातबाजींचा तो दुर्दैवी पण अपरिहार्य असा परिणाम असतो. मग देशामध्ये अप्रत्यक्षपणे अन्न, आरोग्यसेवा व इतर आवश्यक गरजांसाठी पैसा उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होतात.
तंबाखूजन्य उत्पादनावर व तंबाखूच्या पिकावर बंदी घातली पाहिजे. तोवर ही व्यसन विरोधी चळवळ सुरूच राहील. आपल्या पाल्यांना व स्वतःलाही या घातक व्यसनांपासून दूर ठेवलेच पाहिजे. शिवाय इतरांनाही दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. तरच उद्याचा भारत एक निरोगी आणि सशक्त देश निर्माण होईल. त्यासाठी लोकांनी, लोकांसाठी व्यसनांविरोधी लोकचळवळ उभी करायला हवी.





