Pune District : खेड तालुक्यात दुसरे तहसीलदार कार्यालय
Pune District : अपर तहसीलदार, चाकण हे संबंधित खेड तहसीलदार, खेड उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली काम पाहणार आहेत.

राजगुरुनगर : खेड तालुक्यात दुसरे तहसीलदार कार्यालय होण्याचा मार्ग मोकळा झाला असून चाकणला अपर तहसीलदार कार्यालयाला अंतिम मंजुरी मिळाली असल्याची माहिती खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, खेड तालुक्यातील वाढती लोकसंख्या, विस्तीर्ण महसूल क्षेत्र, चाकण परिसरातील जगविख्यात औद्योगिक क्षेत्र आणि नागरिकांना महसूल कामांसाठी कराव्या लागणाऱ्या वारंवार फेऱ्यांची दखल घेत चाकण येथे अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे खेड तालुक्याच्या महसूल क्षेत्रात मोठा प्रशासकीय बदल होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शासनाच्या निर्णयानुसार तहसीलदार कार्यालय, खेडच्या कार्यक्षेत्रात राजगुरुनगर, वेताळे, कडूस, कनेरसर, पाईट, वाडा व कुडे खुर्द अशी सात महसूल मंडळे, तर नव्याने होणाऱ्या चाकण अपर तहसीलदार कार्यालय, चाकणच्या कार्यक्षेत्रात चाकण, आळंदी, पिंपळगाव तर्फे खेड व करंजविहिरे अशी चार महसूल मंडले राहणार आहेत. अपर तहसीलदार, चाकण हे संबंधित खेड तहसीलदार, खेड उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली काम पाहणार आहेत.
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, हा निर्णय राजकारणाचा विषय न करता खेड तालुक्यातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन राज्यशासनाने घेतला आहे. या कार्यालयाच्या मंजुरीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, महसूल मंत्री बावनकुळे यांनी सहकार्य केल्याचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी आवर्जून सांगितले. अपर तहसीलदार कार्यालयासाठी चाकण येथील प्राथमिक शाळेच्या जागेचा विचार असून जानेवारीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
चार वर्षांपासून पाठपुरावा
चाकणला अपर तहसीलदार कार्यालयाला मंजुरी मिळावी यासाठी सन २०२२ पासून मी आणि चाकण येथील कालिदास वाडेकर, ॲड. निलेश कड आदींनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे कोणीही या कामाचे राजकीय श्रेय घेऊ नये. कडूस येथे कुणाला अपर तहसीलदार कार्यालय करायचे असेल त्यांनी खुशाल करावे, त्याला आमची हरकत नाही असा उपरोधक टोला विद्यमान आमदार बाबाजी काळे यांचे नाव न घेता माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी लगावला. पुढे बोलताना माजी आमदार मोहिते म्हणाले, तालुक्याची गरज लक्षात घेऊन हा निर्णय झाला आहे. चाकण, आळंदी, राजगुरुनगर नगरपरिषदा भविष्यात महानगरपालिका होण्याची शक्यता असल्याने तालुक्याचे विभाजन करण्याची आवश्यकता भासणार नाही. दोन तालुके होणे शक्यच नाही असेही मोहिते म्हणाले.





