#INDvARG : अर्जेंटिनाकडून भारताचा पुन्हा एक पराभव

ब्युनोस आयर्स – भारताच्या महिला हॉकी संघाला विजयी सातत्य राखण्यात अपयश आले आहे. गुरुवारी यजमान अर्जेंटिनाकडून पराभव पत्करल्यानंतर शुक्रवारी परतीच्या लढतीत पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या सामन्यात भारताच्या महिला हॉकीपटूंना 2-0 अशी मात सहन करावी लागली. सामना सुरू झाल्यावर केवळ दुसऱ्याच मिनिटाला अर्जेंटिनाच्या सिल्व्हिना इएलाने पहिला गोल केला व संघाला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पहिला हाफ संपेपर्यंत भारताला गोल करण्यात यश आले नाही. त्यानंतर दुसरा हाफ सुरू झाल्यावरही भारतीय संघाच्या हाती यश लागले नाही.
सामन्याच्या 54 व्या मिनिटाला ऑगस्टिना अल्बेट्रोने गोल केला व यजमान संघाची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. त्यानंतरही भारतीय संघाचे गोल करण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले व त्यांना याच गुणफरकावर सामना गमवावा लागला. पहिल्या सामन्यातही भारतीय संघाला 3-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता.





