आरडीएक्स पाठोपाठ पंजाबमध्ये सापडली आणखी स्फोटके
Updated On:

चंडीगढ, -पंजाबमध्ये आरडीएक्स स्फोटकांपाठोपाठ पोलिसांनी एक टिफिन बॉम्ब आणि चार हातबॉम्ब जप्त केले. त्या घडामोडीनंतर पाकिस्तान सीमेलगत असणाऱ्या पंजाबमधील जिल्ह्यांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यात पोलिसांनी एक किलो आरडीएक्स आणि काही पिस्तुले जप्त केली. त्यानंतर त्या जिल्ह्यात पोलिसांनी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्या मोहिमेवेळी एका ठिकाणी रस्त्यालगत झुडपांमध्ये संशयास्पद पिशवी आढळली.
त्यामध्ये टिफिन बॉम्ब आणि हातबॉम्ब ठेवण्यात आले होते. ते बॉम्बनाशक पथकाने निकामी केले. काही दिवसांपूर्वी गुरदासपूर जिल्ह्यातच आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या निर्देशावरून सक्रिय असणारे दहशतवादी जाळे उघडकीस आले. त्या घडामोडींमुळे सुरक्षा यंत्रणा आणखी सतर्क झाल्या आहेत.





