शिक्षण विभागाच्या योजनांसाठी आणखी एक शिक्षणाधिकारी

संतोष पवार
सातारा – प्राथमिक शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हास्तरावर आता शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. शिक्षण विभागाचा कारभार आणखी गतीमान होण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी अशी तीन मुख्य पदे यापूर्वी जिल्हास्तरावर कार्यरत होती. काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाने निरंतर शिक्षण विभाग बंद करुन या विभागाची जबाबदारी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे दिली होती. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर दिवसेंदिवस कामाचा अतिरिक्त भार पडत होता.
या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने शिक्षणा संचालनालयाची पुनर्रचना करुन शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालयाची तर जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (योजना) या कार्यालयाची निर्मिती केली आहे. या शासन निर्णयान्वये अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालयाचे नामांतर शिक्षण संचालनालय (योजना) असे करण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालय तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडील योजना शिक्षण संचालनालय (योजना) यांच्याकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. नव्याने निर्माण होणाऱ्या शिक्षणाधिकारी (योजना) पदाचा कार्यभार माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) कार्यालयाच्या जागेचा ताबा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे देण्यात आला आहे.
या जागेचा ताबा आता शिक्षणाधिकारी (योजना) यांचकडे वर्ग होणार आहे. योजनासंबंधीचे सर्व अभिलेखे व कर्मचारी या विभागाकडे वर्ग होणार आहेत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या काही योजना नव्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार आहेत.
कोळेकरांकडे अतिरिक्त कार्यभार
सातारा जिल्ह्यात नव्याने निर्माण झालेल्या शिक्षणाधिकारी (योजना) या पदाचा कार्यभार माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्याकडे येणार आहे. याबाबत दोन दिवसात निर्णय होणार आहे. शासनाकडून नव्याने नेमणूक होईपर्यंत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार राहणार आहे.





