Japan Airlines : जपानमध्ये पुन्हा सायबर हल्ला ! आता एअरलाइन्सला केले लक्ष्य

Japan Airlines – जपान एअरलाइन्सला (जेएएल) गुरूवारी सकाळी सायबर हल्ल्याचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांच्या अंतर्गत आणि बाह्य यंत्रणेवर परिणाम झाला. जपान एअरलाइन्सने स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:24 वाजता सायबर हल्ला झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती देताना सायबर हल्ल्यामुळे तिकीट विक्री थांबवण्यात आली आहे असे सांगण्यात आले. एअरलाइनच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेळा माहिती देताना सांगितले की या हल्ल्यामुळे उड्डाण विलंबाबाबत अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही. जपान एअरलाइन्स ही देशातील दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी आहे. ऑल निप्पॉन एअरवेज ही जपानची सर्वात मोठी विमान कंपनी आहे.
अलीकडच्या काळात जपानमध्ये सायबर हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याआधी २०२२ मध्ये टोयोटालाही सायबर हल्ल्याचा सामना करावा लागला होता. या हल्ल्यामुळे कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यामुळे टोयोटाचे देशातील प्लांट दिवसभर बंद ठेवावे लागले होते.
या वर्षी जूनमध्ये लोकप्रिय जपानी व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म निकोनिकोलाही सायबर हल्ल्याचा सामना करावा लागला होता. त्यामुळे व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म निकोनिकोलाही आपली सेवा निलंबित करावी लागली होती.
याशिवाय 2024 मध्ये सिएटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावरही सायबर हल्ल्याचा सामना करावा लागला होता. या सायबर हल्ल्यामुळे सिएटलच्या इंटरनेट आणि वेब सिस्टममध्ये समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कामकाजात मोठी अडचण येत होती.





