बदलापूर : महापालिका निवडणुकांच्या धामधुमीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. संतोष धुरी आणि हेमंत कांबळे यांच्यानंतर आता मनसेच्या आणखी एका महत्त्वाच्या महिला नेत्या पक्ष सोडून गेल्या आहेत. बदलापूरच्या मनसे महिला शहर अध्यक्ष संगीता चेंदवणकर यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री आशिष दामले यांच्या उपस्थितीत पार पडला. अनेक वर्षांपासून बदलापूर शहरात मनसेचे संघटन मजबूत करणाऱ्या संगीता चेंदवणकर या आक्रमक महिला कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्या दीर्घकाळ बदलापूरच्या महिला शहराध्यक्ष पदावर कार्यरत होत्या. स्थानिक राजकारणातील गळचेपीमुळे हा निर्णय घेतल्याचे संगीता चेंदवणकर यांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे मुंबईत ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवत असतानाच बदलापूरमध्ये मात्र मनसेला मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र आहे. पक्षप्रवेशानंतर बोलताना संगीता चेंदवणकर म्हणाल्या, विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकीच्या काळात माझी गळचेपी झाली. कोणत्याही कार्यकर्त्यावर अशी वेळ येऊ नये, पण ती वेळ माझ्यावर आली. त्या काळात माझी आई आजारी होती, तरीही बदलापूरकरांनी मला मते दिली. ती मते माझ्या हक्काची होती. त्या पुढे म्हणाल्या, राज ठाकरे यांनी मला नावारूपास आणले, याची मला जाणीव आहे. माझा संघर्ष सर्वांनी पाहिला आहे. मात्र मला सभागृहात जाऊ नये यासाठी प्रयत्न झाले. मी घरात बसणारी कार्यकर्ती नाही, त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या पक्षप्रवेशामुळे बदलापूरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची ताकद स्थानिक पातळीवर वाढल्याचे मानले जात आहे.