Political News: नावांची घोषणा, जल्लोष अन् सत्कार, नियुक्ती मात्र अधांतरी! भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
महापालिकेला अर्ज व आवश्यक कागदपत्रेच प्राप्त नाहीत

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या सात जागांसाठी भाजपने तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नावे जाहीर केली. त्यानंतर संबंधित इच्छुकांच्या समर्थकांनी जल्लोष केला, रॅली काढल्या, फलक लावले, गुलाल उधळला आणि मिठाई वाटली. काही ठिकाणी तर जाहीर झालेल्या सदस्यांचे नगरसेवक म्हणून सत्कारही सुरू झाले.
मात्र, या सगळ्या उत्साहात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. महापालिका प्रशासनाकडे अद्याप या सातही जणांचे अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे जमा झालेली नाहीत. त्यामुळे नावांची घोषणा झाली असली, तरी प्रत्यक्ष नियुक्तीचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही.
महापौर रवि लांडगे, सभागृहनेते प्रशांत शितोळे आणि भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी २० नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत सात नावांची घोषणा केली होती. यामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जयनाथ काटे, सचिन साठे आणि विशाल कलाटे, भोसरीतून ऋषिकेश म्हेत्रे आणि कुलदीप परांडे, तर पिंपरीतून राजेश पिल्ले आणि कुणाल लांडगे यांचा समावेश आहे. या सदस्यांचा प्रस्तावित कार्यकाळ १५ महिन्यांचा असणार आहे.
मात्र, आवश्यक कागदपत्रेच जमा नसल्याने नियुक्तीचा प्रस्ताव अद्याप पुढे जाऊ शकलेला नाही. नगरसचिव उल्हास जगताप यांनीही कागदपत्रे प्राप्त झाली नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा निर्णय आता डिसेंबर महिन्यातील सर्वसाधारण सभेत होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यातील तहकूब सभा नोव्हेंबरमध्ये पुन्हा तहकूब करण्यात आली. या सभेच्या विषयपत्रिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) तीन सदस्यांच्या नियुक्तीचाच प्रस्ताव आहे.
त्यामध्ये सीमा सावळे, राजेंद्र जगताप आणि फजल शेख यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपच्या सात सदस्यांच्या नियुक्तीसाठी उपसूचना मांडली जाणार की प्रशासनाला फेरप्रस्ताव सादर करण्यास सांगितले जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
महापालिकेतील पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांची नाराजी
भाजपने जाहीर केलेल्या यादीमुळे पक्षांतर्गत नाराजीचीही चर्चा सुरू झाली आहे. अनेक वर्षे संघटनेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्याने निवडीच्या निकषांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही नेत्यांच्या निकटवर्तीयांना प्राधान्य दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
विशेष म्हणजे सातही जागांवर पुरुषांचीच निवड करण्यात आल्याने महिला कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व का मिळाले नाही, असा सवालही उपस्थित होत आहे. त्यातच आता ज्यांची निवड झाली त्यांच्या नियुक्तीलाही उशिर होत असल्याने महापालिकेतील पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांची नाराजी ओढावत आहे.
कार्यकाळातील सुमारे नऊ महिने आधीच संपले
दरम्यान, महापालिकेतील एकूण दहा स्वीकृत सदस्यांपैकी भाजपच्या वाट्याला सात, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला तीन जागा आहेत. मार्चमध्ये सुरू झालेली नियुक्ती प्रक्रिया भाजपमधील नावांवर एकमत न होणे, प्रस्ताव पुढे ढकलणे आणि सर्वसाधारण सभा तहकूब होणे अशा कारणांमुळे रखडली.
या विलंबामुळे प्रस्तावित १५ महिन्यांच्या कार्यकाळातील सुमारे नऊ महिने आधीच संपले आहेत. आता डिसेंबरच्या सभेत नियुक्तीचा मार्ग निघतो की हा पेच आणखी लांबतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





