राहाता : राहाता नगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी एकूण १० प्रभागांचे २० नगरसेवक पदासाठीची प्रभाग निहाय आरक्षण सोडत बुधवारी प्रांताधिकारी माणिक आहेर व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपरिषदेच्या कार्यालयात पार पडली. या सोडतीनुसार १० महिला तर १० पुरुषांना निवडणुकीद्वारे नगरसेवक पदाची संधी मिळणार आहे. पुरुष व महिलांना समान जागा आल्याने राहाता पालिकेत पुरुष महिलांचे राजकीय बलाबल समसमान राहणार असल्याचे दिसून येत आहे उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या पुरुष उमेदवारांच्या प्रभागात पुरुषांऐवजी महिलेचे आरक्षण निघाल्याने त्यांचे स्वप्न भंगले. त्याजागी आता पत्नीला उमेदवारी करावी लागेल. काही उमेदवारांच्या बाबतीत ते इच्छुक उमेदवार ज्या प्रवर्गात आहे, त्या प्रवर्गा ऐवजी त्यांच्या प्रभागात दुसऱ्या प्रवर्गाचे आरक्षण पडल्याने त्यांना आता दुसरा प्रभाग शोधण्याची वेळ येणार आहे. प्रभागनिहाय निघालेले आरक्षण पुढीलप्रमाणे : प्रभाग .१ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव, ब-पुरुष सर्वसाधारण, प्रभाग २ अ- अनुसूचित जमाती महिला राखीव, ब- पुरुष सर्वसाधारण, प्रभाग ३ अ- अनुसूचित जाती जमाती महिला राखीव, ब- पुरुष सर्वसाधारण, प्रभाग ४ अ- अनुसूचित जाती जमाती महिला राखीव, ब- पुरुष सर्वसाधारण, प्रभाग ५ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण पुरुष राखीव, ब- महिला सर्वसाधारण, प्रभाग ६ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण पुरुष राखीव, ब महिला सर्वसाधारण, प्रभाग ७ अ पुरुष राखीव, ब महिला सर्वसाधारण, प्रभाग ८ अ- अनुसूचित जाती सर्वसाधारण पुरुष राखीव, ब- महिला सर्वसाधारण, प्रभाग ९ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव, ब- पुरुष सर्वसाधारण,प्रभाग १० अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव, ब- पुरुष सर्वसाधारण चौकट पक्षश्रेष्ठींना मोठी डोकेदुखी बुधवारी झालेल्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीनंतर इच्छुक उमेदवारांनी आपल्याला उमेदवारी मिळावे म्हणून शहरातील ज्येष्ठ नेते यांना गळ घालण्यास सुरुवात केली असून, नगरसेवक होण्यासाठी इच्छुक उमेदवारांची यादी मोठ्या प्रमाणात असल्याने उमेदवारी न मिळाल्यास उमेदवारांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींना मोठी डोकेदुखी होणार आहे.