मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; ‘या’ कर्मचाऱ्यांना 29 हजारांचा दिवाळी बोनस जाहीर

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 – महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगची पत्रकार परिषद होण्याच्या काही मिनिटं आधी एकनाथ शिंदे यांनी कनिष्ठ पदांवरील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 29 हजारांच्या दिवाळी बोनसची घोषणा केली आहे. ही रक्कम गतवर्षीच्या तुलनेत 3 हजार जास्त आहे. किंडरगार्टन शिक्षक आणि आशा सेविकांनाही बोनस मिळणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम –
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यातील सर्व 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होतील. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी जारी केली जाईल, तर नामांकनाची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर आहे. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून 4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक –
– निवडणूक अधिसूचना – 22 ऑक्टोबर
– नामांकनाची अंतिम तारीख – 29 ऑक्टोबर
– नामनिर्देशनपत्रांची छाननी – 30 ऑक्टोबर
– उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – 4 नोव्हेंबर
– मतदानाची तारीख – 20 नोव्हेंबर
– मतमोजणी तारीख – 23 नोव्हेंबर
महाराष्ट्रातील मतदारांची संख्या –
महाराष्ट्रातील एकूण मतदारांची संख्या सुमारे 9.63 कोटी असून त्यापैकी 4.97 कोटी पुरुष मतदार आहेत. तर महिला मतदारांची संख्या 4.66 कोटी आहे. तरुण मतदारांची संख्या 1.85 कोटी आहे. तर पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या 20.93 लाख आहे. महाराष्ट्रात एकूण 52 हजार 789 ठिकाणी 1 लाख 186 मतदान केंद्रे असतील. त्यापैकी 42 हजार 604 शहरी भागात तर 57 हजार 582 ग्रामीण भागात आहेत. एका मतदान केंद्रावर सरासरी 960 मतदार मतदान करतील.




