Dengue Cases: डेंग्यू रोखण्यासाठी कृती आराखडा जाहीर करा; माजी नगरसेवक अरुण माने यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
Dengue Cases: डेंग्यूचा प्रश्न केवळ आरोग्यापुरता मर्यादित नसून तो नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित

तळेगाव दाभाडे – शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, याचा कृती आराखडा तातडीने जाहीर करावा, अशी मागणी माजी नगरसेवक अरुण माने यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
डेंग्यूचा प्रश्न केवळ आरोग्यापुरता मर्यादित नसून तो नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. त्यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषद, आरोग्य विभाग आणि संबंधित प्रशासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घ्यावी. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माने यांनी केली आहे.
शहरातील नागरिकांना वेळेवर वैद्यकीय तपासणी आणि उपचार उपलब्ध करून द्यावेत. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहरात विशेष मोहीम राबवावी. डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे शोधून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
नागरिकांचे आरोग्य आणि जीव सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणतीही दिरंगाई न करता तातडीने कार्यवाही करावी, असे माने यांनी निवेदनात नमूद केले आहे.
डेंग्यू प्रतिबंधासाठी महिला कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण
डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यापासून ३६ महिला कर्मचाऱ्यांकडून जनजागृती आणि सर्वेक्षण सुरू आहे. या महिला घरोघरी जाऊन डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती नागरिकांना देत आहेत.
तसेच शहरात धूरफवारणी आणि औषध फवारणीही सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली. नागरिकांनी सतर्क राहून सर्वेक्षणासाठी येणाऱ्या महिलांना आवश्यक माहिती द्यावी आणि मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्याधिकारी दापकेकर यांनी केले आहे.




