Nagar | अण्णाभाऊंचे साहित्य परिवर्तनाला चालना देणारे : खा. नीलेश लंके

पारनेर, (प्रतिनिधी) – अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरल्याचे सांगताना महाराष्ट्राच्या जडण घडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन खासदार नीलेश लंके यांनी केले.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी खा. लंके यांनी साठे यांच्या कार्याला उजाळा दिला.
यावेळी खा. बजरंग सोनवणे, अनिल गंधाक्ते आदी उपस्थित होते. लंके म्हणाले, अण्णाभाऊंनी सर्वसामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून शाहीरी करत त्यांनी आयुष्यभर वंचितांसाठी समाजप्रबोधन केले.
जाती व्यवस्था आणि गरीबीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाहीत. मात्र अवघ्या दीड दिवसांची शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी साहित्य क्षेत्रात मोठी झेप घेतली. लेखणी आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिल्याचे खा. लंके म्हणाले.





