‘आता तपासाला योग्य दिशा मिळेल’; कराडच्या मकोका कारवाईवर अंजली दमानियांची प्रतिक्रिया

बीड – संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक असलेल्या वाल्मीक कराडवर अखेर मकोका लावण्यात आला आहे. हत्येच्या प्रकरणात मकोकाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. केज न्यायालयाने वाल्मीक कराडला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली. आता एसआयटीलाही त्याची कोठडी मिळाली आहे. वाल्मीक कराडची 10 दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती, परंतु, कोर्टाने ती फेटाळून लावत न्यायालयीन कोठडी दिल्याचे वाल्मीक कराडच्या वकिलांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभरात चर्चेत आहेत. यात खंडणी प्रकरणी अटकेत असलेला वाल्मीक कराडची 14 दिवसांची पोलिस कोठडी आज संपली. कराडला आज केज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आता वाल्मीक कराड हत्याप्रकरणात गुन्हा दाखल होणार का? हे पहावे लागणार आहे.
दरम्यान, कराडवरील मकोका कारवाईवर प्रतिक्रिया येतआहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले होते. आता मकोका कारवाईनंतर त्यांची प्रतिक्रिया आली आहे. दमानिया म्हणाल्या, वाल्मीक कराडवर मकोका लावला. एसआयटीने त्याला मकोका कोर्टातही नेले, हे ऐकून बरे वाटते. आता तपासाला योग्य दिशा मिळेल, असा विश्वास अंजली दमानिया यांनी व्यक्त केला. खंडणी आणि संतोष देशमुख हत्या दोन्ही वेगवेगळे नव्हते. संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातूनच झाली होती हे आता सिद्ध होईल, असेही त्या म्हणाल्या. वाल्मीक कराडला पोलिस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी दिली ही गोष्ट मला खटकत असल्याचे दमानिया यांनी म्हटले.
SIT ला मिळाली वाल्मीक कराडची कोठडी
हत्येच्या गुन्ह्यात वाल्मीक कराडचा ताबा घेण्याची परवागनी एसआयटीला मिळाली आहे. जेलमध्ये प्रोडक्शन वॉरंट दाखवून एसआयटी त्याचा ताबा घेणार आहे. हत्येच्या गुन्ह्यात उद्या वाल्मीक कराडला कोर्टात हजर करणार आहेत. दरम्यान, केज न्यायालयाने वाल्मीक कराडला खंडणी प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
खासदार सोनवणे यांचे शांततेचे आवाहन
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हे सर्व आरोपी मकोकामध्ये सामील होतील, असा विश्वास बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला. पोलिसांच्या तपासात जे कुणी सापडत असतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. बीड जिल्ह्यात तणाव निर्माण होणार नाही. तणाव निर्माण करण्याचा विषय काय आहे? बीड जिल्ह्यातील जनतेने शांतता बाळगावी, असे आवाहन बजरंग सोनवणे यांनी केले आहे.
कायद्याच्या कचाट्यात सापडणाऱ्यांना सोडले जाणार नाही – सुरेश धस
वाल्मीक कराडवर मकोका लागल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. एसआयटीने जे काही काम केले आहे, जी काही या तपासात प्रगती होत आहे, त्यात कोर्टाची ऑर्डर असते. त्यात याने मागणी केली, त्याने मागणी केली याचा विषयच नाही, असे धस म्हणाले. राज्य सरकारने आता जी एसआयटी नेमली आहे, त्यांनी त्यांचे काम दाखवले आहे. आता कायद्याच्या कचाट्यात जे काही सापडतील, त्यांना सोडले जाणार नाही, असेही धस यांनी म्हटले.





