Rupali Chakankar : रूपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल्स, एकनाथ शिंदेंच्या नावाचाही उल्लेख, दमानियांच्या दाव्याने खळबळ
Rupali Chakankar : अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर आणि एकनाथ शिंदे यांच्या कॉल डिटेल्सचा खुलासा केला आहे.

Rupali Chakankar : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक मोठा बॉम्ब टाकला असून, खरात आणि राज्यातील बड्या राजकीय नेत्यांमधील संभाषणाची धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे.
खरातच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डचा (सीडीआर) दाखला देत दमानिया यांनी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रूपाली चाकणकर यांच्यासह अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
अंजली दमानिया यांनी दावा केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या रूपाली चाकणकर यांनी खरातला १७७ वेळा फोन केला असून, त्यांच्यात तब्बल ३३,७२७ सेकंद संभाषण झाले आहे. इतकेच नव्हे, तर चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांनीही २३६ कॉल्स केल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.
इतका वेळ कोणीही आपल्या गुरूशी बोलत नाही, त्यामुळे चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दमानिया यांच्या दाव्यानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरातला १७ वेळा फोन केला असून, त्यातील एका कॉलवर २१ मिनिटे चर्चा झाली आहे.
याशिवाय चंद्रकांत पाटील (८ कॉल्स), सुनील तटकरे (८ कॉल्स) आणि आशिष शेलार (१ कॉल) यांनीही खरातशी संपर्क साधल्याचे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोढे यांनी खरातला १८९ वेळा फोन केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
ही सर्व माहिती मुख्यमंत्री, एसआयटी आणि पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आल्याचे सांगत, या नेत्यांनी खरातशी नक्की कशासाठी संवाद साधला, याचे उत्तर जनतेला द्यावे, असे आवाहन दमानिया यांनी केले आहे. या खुलाशामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सत्ताधारी नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.






