धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगला वादावर अंजली दमानिया आक्रमक; म्हणाल्या “पुढच्या 48 तासात…”

Dhananjay Munde | माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पाच महिने लोटले आहे. मात्र अद्यापही ते सरकारचे ‘सातपुडा’ हे निवासस्थान या ठिकाणीच राहत आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुंडे यांनी मुंबईतील सातपुडा सरकारी बंगला बेकायदेशीररित्या वापरल्याचा आरोप करत दमानिया यांनी सरकारला लीगल नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी मुंबईत आपल्याला कुठेही घर नसल्यामुळं बंगला सोडला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी आधी माध्यमांशी बोलताना दिलं होतं. अशातच गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी मुंबईत गिरगाव चौपाटीवर असलेल्या या घराचा उल्लेख केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
स्वतःचं घर असताना सरकारी बंगला वापरणं चुकीचं – दमानिया
याचं मुद्द्यावरून ‘धनंजय मुंडे यांच्याकडून पुढच्या 48 तासात घर खालीकरून सरकारने प्रलंबित 46 लाखांचा दंड देखील वसूल करावा, मुंडे यांच्याकडे स्वतःचं घर असताना सरकारी बंगला वापरणं चुकीचं आहे. सरकारने त्वरित कारवाई करावी आणि बंगला रिकामा करून दंड वसूल करावा,’ अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी सरकारला लीगल नोटीस पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
अंजली दमानिया यांनी आक्षेप घेत सांगितलं की, मुंडे यांनी भाड्याच्या घरात राहावं, परंतु सरकारी बंगला वापरणं कायद्याच्या दृष्टीने चुकीचं आहे. विशेष म्हणजे, मुंडे यांच्या 2024 च्या निवडणूक प्रत (एफिडेव्हिट) मध्ये वीरभवन या इमारतीत 2151 स्क्वेअर फूटचा चार बेडरूमचा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. तरीही त्यांनी सातपुडा बंगला कायम ठेवला.
धनंजय मुंडे यांनी सातपुडा सरकारी बंगला वापरण्याचं कारण देत त्यांचं मुंबईत स्वतःचं घर नाही. त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि तब्येतीच्या कारणांमुळे त्यांना मुंबईत राहणं आवश्यक आहे, असे सांगितले होते.
हेही वाचा :





