Pune District : करंदीत पशुसंवर्धन विभाग अलर्ट
Pune District : करंदी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून बियाण्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. वसंत गारुडकर, डॉ. नितीन पवार व पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल येडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

केंदूर : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने करंदी येथे १०० टक्के अनुदानावर संकरित मका चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले. उपक्रमांतर्गत करंदी, वढू बुद्रुक, वाजेवाडी, आपटी, पाबळ, पिंपळे जगताप, जातेगाव बुद्रुक व जातेगाव खुर्द या आठ गावांतील १८० पशुपालक शेतकऱ्यांना बियाण्यांचा लाभ देण्यात आला.
यावेळी हा उपक्रम जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल काळुराम शिवले, पंचायत समिती सदस्य वंदना पवार, सुचिता थिटे यांच्या उपस्थितीत पार पडला.
करंदी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून बियाण्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. वसंत गारुडकर, डॉ. नितीन पवार व पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल येडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मका लागवडीचे नियोजन, शास्त्रीय पेरणी पद्धती, चारा व्यवस्थापन, मुरघास निर्मिती, वाळलेल्या चाऱ्यावर प्रक्रिया, अझोला उत्पादन, पशुसंवर्धन विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी वाटप करण्यात आलेल्या संकरित मका बियाण्यांपासून योग्य नियोजन व लागवड केल्यास दोन महिन्यांत हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे जनावरांना पौष्टिक चारा मिळण्यासोबतच दूध उत्पादन वाढविण्यास आणि पशुपालनाचा खर्च कमी करण्यास मदत होणार आहे. यावेळी डॉ. अमोल येडे म्हणाले, शेतकऱ्यांनी वितरित केलेल्या मका बियाण्यांची तातडीने पेरणी करावी. त्यामुळे जानेवारीनंतर उद्भवू शकणाऱ्या चारा टंचाईवर मात करणे शक्य होईल. पशुपालकांनी आतापासूनच चाऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे. शंभर टक्के अनुदानावर बियाणे मिळाल्याने पशुपालकांचा बियाणे खरेदीचा खर्च वाचणार आहे. संभाव्य चारा संकटाच्या पार्श्वभूमीवर उपक्रमामुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना लाभार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.





