मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख 15 महिन्यांनी जामिनावर सुटल्यानंतर त्यांच्या मूळ गावी नागपूरला परतले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर अनिल देशमुख यांनी आपल्याला जेलमध्ये एक ऑफर मिळाल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. तसेच, आपल्याला खोट्या आरोपात गुंतवून तुरुंगात टाकल्याचा दावाही यावेळी देशमुख यांनी केला. अनिल देशमुख यांनी दावा केला की, सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोंदवलेल्या खटल्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे उच्च न्यायालयाला आढळून आले. ते म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, मात्र ते आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या चांदीवाल आयोगासमोर हजर झाले नाहीत.वर्धा येथे पार पडलेल्या एका एनजीओच्या कार्यक्रमात देशमुख बोलत होते. यावेळी बोलताना देशमुख यांनी धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले, “जेव्हा मी तुरुंगात होतो, तेव्हा माझ्याकडे एक ऑफर आली होती, जी मी नाकारली. जर मी ती ऑफर स्वीकारली असती, तर महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांपूर्वी पडले असते, पण माझा न्यायावर विश्वास आहे.” म्हणून मी जेलमधून सुटण्याची वाट पाहत होतो. अनिल देशमुख यांना नोव्हेंबर 2021 मध्ये मनी लॉंड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर अनेक महिने त्याला जेलमध्ये देखील राहावे लागले. अखेर जामीन मंजूर झाल्याने त्यांची सुटका झाली आणि ते आपल्या मतदार संघामध्ये परतले.