Anil Ambani: रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या अडचणींत आता मोठी भर पडली असून, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. अंबानींचे मुंबईतील पाली हिल परिसरातील १७ मजली आलिशान निवासस्थान असलेल्या ‘अॅबोड’ (Abode) वर ईडीने तात्पुरती जप्ती आणली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सशी (आरकॉम) संबंधित बँक फसवणूक आणि कर्जाच्या रकमेचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली असून, या मालमत्तेची किंमत सुमारे ३,७१६ कोटी रुपये इतकी अंदाजित आहे. आतापर्यंत १५,७०० कोटींची मालमत्ता जप्त – या कारवाईमुळे या संपूर्ण घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या एकूण मालमत्तांची किंमत तब्बल १५,७०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम १७ अंतर्गत ईडीने रिलायन्स समूहाशी संबंधित अनेक कंपन्यांच्या ५० हून अधिक कार्यालयांवर छापे टाकले होते. या तपासादरम्यान मुंबई आणि दिल्लीतील २५ हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली असून, ६६ वर्षीय अनिल अंबानी यांना या प्रकरणात पुन्हा एकदा दिल्लीत ईडीसमोर हजेरी लावावी लागण्याची शक्यता आहे. काय आहे कारण? तपास यंत्रणांच्या प्राथमिक अहवालानुसार, २०१७ ते २०१९ या कालावधीत येस बँकेकडून घेतलेल्या सुमारे ३,००० कोटी रुपयांच्या कर्जाचा विनियोग मूळ कारणासाठी न करता तो इतरत्र वळवण्यात आला होता. हा पैसा शेल कंपन्यांच्या जाळ्याद्वारे फिरवून गैरव्यवहार केल्याचा संशय ईडीला आहे. तसेच, येस बँकेच्या प्रवर्तकांशी संबंधित संस्थांना फायदा मिळवून देऊन नियमबाह्य पद्धतीने कर्ज मंजूर करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. हेही वाचा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संत गजानन महाराज समाधीचे घेतले दर्शन, राष्ट्रीय आरोग्य मेळा २०२६ चे उद्घाटन या प्रकरणाला अधिक धार मिळाली ती भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) निर्णयामुळे. एसबीआयने आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपनीला ‘फ्रॉड’ (फसवणूक करणारे) म्हणून घोषित केले आहे. एसबीआयचे २,२२७ कोटी रुपयांचे कर्ज आणि ७८६ कोटी रुपयांची बँक गॅरंटी या प्रकरणात अडकलेली असून, बँक आता सीबीआयकडे याप्रकरणी रीतसर तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडमधील संशयास्पद कर्जवाढीचाही तपास सध्या सुरू असून अंबानींच्या अडचणीत नजीकच्या काळात मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.