Pimpri : कार्ला गडावर संतप्त मधमाशांचा भाविकांवर हल्ला

कार्ला : वर्षाचा पहिला दिवस असल्याने बुधवारी (दि.१) कार्ला गडावर एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. परंतु या गर्दीतील काही हुल्लडबाज आणि अतिउत्साही भाविकांनी धूराचे फटाके फोडल्याने गडावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्याला इजा झाली आणि संतप्त मधमाशांनी गडावरील भाविकांवर हल्ला चढवला. यामुळे काहीवेळ एकच गोंधळ उडाला होता. मधमाशांच्या या हल्ल्यात काही भाविक किरकोळ जखमी झाले.
प्राप्त माहितीनुसार बुधवारी कार्ला गडावर एकविरा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. यात काही भाविक हे पालख्या घेऊन गडावर आले होते. यातील अतिउत्साही भाविकांनी वाद्यांचा जोरजोरात आवाज करीत रंगीत धुराचे फटाके फोडले. त्यातून पसरलेल्या धुरामुळे लेणीजवळ असलेल्या मधमाशांच्या पोळ्याला धक्का बसला.
पोळ्याला इजा झाल्याने पोळ्यावरील संतप्त मधमाशांनी भाविकांवर हल्ला चढवला. यामुळे गडावर काहीकाळ एकच धांदल उडाली होती. भाविकांच्या या पळापळीने मधमाश्या आणखीनच पसरल्या. दुपारी साधारण साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने यात जिवितहानी झाली नाही. परंतु अनेक भाविक जखमी झालेत.
स्थानिक ग्रामस्थ व एकविरा देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांनी जखमींना तत्काळ गडावरून खाली आणले व प्रथमोपचार केले. काही भाविकांना उपचारासाठी दवाखान्यातही हलविण्यात आले. थोड्या कालावधीनंतर एकविरा मंदिर परिसरातील परिस्थिती पूर्ववत झाली. अतिउत्साही भाविक व नियोजनाचा अभावामुळे अशा घटना घडत असतात. त्यामुळे गडावर फटाका बंदीची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
गडावर फटाका बंदी कायम ठेवावी –
मुंबई येथून आलेल्या देवीच्या पालखीसोबतच्या भाविकांनी गडावर फटाके वाजविले. त्याचा फटका बाकीच्या भक्तांना बसला. परंतु या घटनेनंतर गडावर फटाके वाजविण्यावर बंदी असतानाही काही भाविक याकडे दुर्लक्ष करतात व फटाके फोडतात. ही गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली. यामुळे यापुढे एकविरा गडावरील फटाका बंदी कायम ठेवावी अशी मागणी होत आहे. सोबत मंदिर व्यवस्थापन समितीनेही नियमांची कडक अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मधमाशांनी हल्ला केल्यावर काय करावे?
१. शांत रहा आणि घाबरू नका : घाबरून आरडाओरडा केल्याने मधमाशा अधिक आक्रमक होतात. यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा.
२. लवकर सुरक्षित ठिकाणी जा : सुरक्षित ठिकाण शोधा, जसे की घर, गाडी किंवा खोली. मधमाशा बंद जागेत फार काळ टिकू शकत नाहीत.
३. धावत पळा, पण सरळ रेषेत : सुरक्षित ठिकाण जवळ नसल्यास शक्य तितक्या वेगाने सरळ रेषेत धावण्याचा प्रयत्न करा. मधमाशा थोड्या अंतरापर्यंत पाठलाग करतात.
४. तोंड व डोळे झाका : तोंड, डोळे व नाक रुमाल, कपड्याने किंवा हातांनी झाकून ठेवा. मधमाशा मुख्यतः चेहऱ्याच्या संवेदनशील भागांना लक्ष्य करतात.
५. डंख काढून टाका : मधमाशा डंख मारल्यानंतर विष सोडतात. डंख चिमटीच्या सहाय्याने किंवा नखांने अलगद काढून टाका. पण त्वचा दाबू नका, कारण विष अधिक पसरू शकते.





