स्टेअरिंग हाती असताना राग बरा नव्हे; पीएमपी बसचालकांचे वेळोवेळी समुपदेशन होणे आवश्यक

पुणे – बस चालवताना हाती स्टेअरिंग असल्यावर आपले मन, डोके शांत आणि रागावर नियंत्रण पाहिजेच. अन्यथा “संतोष माने’सारख्या घटना होण्यास वेळ लागत नाही. त्यासाठी चालक आणि वाहकांचे वेळोवेळी समुपदेशन होणे आवश्यक आहेच. ते झाले असते, तर सेनापती बापट रस्त्यावरील घटना टाळता येऊ शकली असती.
पीएमपीच्या अपघातांची माहिती घेतली, तर बहुतांश अपघात हे ठेकेदारांकडील बसचे झाले आहे. रविवारी झालेल्या प्रकारातील बसही ठेकेदाराचीच आहे. चालक आणि एका कारचालकामध्ये वाद झाले होते. यातून चालकाने स्टंटबाजी करत बस मागे घेत कारला धडक दिली.
धक्कादायक म्हणजे, बसमध्ये 40 ते 50 प्रवासी होते. असे असताना चालकाने प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन घडलेल्या प्रकारावर त्रागा न करता तिथून निघून जाणे अपेक्षित होते. जास्तीच वाद झाला, तर बस बाजूला लावून पोलिसांना बोलावून घडलेल्या प्रकाराचा निपटारा करणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. सुदैवाने चालकाने बस मागे घेतली, त्यावेळी आठ ते दहा कार बाजूला होत्या. हे लक्षात घेता मोठी दुर्घटना टळली, असेच म्हणावे लागेल.
प्रशासन कठोर भूमिका घेणार का?
वाहनांची वाढती गर्दी आणि बेशिस्त वाहतुकीमध्ये एवढी मोठी बस घेऊन जाणाऱ्या चालकाची मानसिक स्थिती ही चांगलीच पाहिजे. मात्र, ठेकेदाराकडील चालक आज आहे तर उद्या नाही, अशी परिस्थिती. त्यात त्याचे समुपदेशन होते का? असा प्रश्न उपस्थित होतो. याअधी असा चालकांमुळे पीएमपीला फटका बसला असून, पीएमपी प्रशासनाकडून कठोर भूमिका कधी घेणार?
“पीएमपी बसचालक, वाहक आणि कर्मचारी यांचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन केले जाते. त्यासाठी कार्यशाळा घेतली जाते. आता पुन्हा ही कार्याशाळा घेण्यात येईल. त्यात संबधित ठेकेदारांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.”- सतीश घाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल





