Aneet Padda: ‘सैयारा’ चित्रपटातील भूमिका अनीत पड्डासाठी खास; म्हणाली, “आजोबांना माझं नाव आठवत नाही, पण त्यांनी मला माझ्या चित्रपटात ओळखलं”

Aneet Padda: अभिनेत्री अनीत पड्डा हिने मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ती अल्झायमर झालेल्या मुलीची भूमिका करताना दिसते. हा तिचा डेब्यू चित्रपट असून, प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून तिच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे.
आजोबांची आठवण
अलीकडील मुलाखतीत अनीतने सांगितले की, ‘ही भूमिका माझ्यासाठी खूप भावनिक होती कारण माझ्या आजोबांनाही अल्झायमर आहे. त्यांना आता फारशा गोष्टी आठवत नाहीत. ते माझं नावसुद्धा विसरतात. पण ते मला “हीरापुत” किंवा “मक्खन” म्हणून हाक मारतात. चित्रपटाचा संदेश, “दिमाग भूल जाता है, पर दिल कभी नहीं भूलता” माझ्या आजोबांसाठी अगदी खरं ठरतो.’
अनीतला वाटलं होतं की तिचे आजोबा तिला चित्रपटात ओळखणार नाहीत. पण जेव्हा कुटुंबीयांनी त्यांना चित्रपटाचे व्हिडिओ दाखवले, तेव्हा त्यांनी हसून “हीरापुत” आणि “मक्खन दी मूव्ही” असं म्हटलं. अनीत म्हणाली ‘तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता.’
सैयारा चित्रपटाचा विक्रम
‘सैयारा’ हा चित्रपट एक बंडखोर संगीतकार आणि गाणी लिहिणाऱ्या पण अल्झायमरशी झुंजणाऱ्या मुलीची प्रेमकथा सांगतो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ₹५६३ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे तो नवोदित कलाकारांचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून, भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी प्रेमकथा म्हणून नोंदवला गेला आहे.
यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विद्हानी यांनी हा चित्रपट निर्मित केला असून, शाहरुख खानच्या ‘पठाण’ नंतरचा त्यांचा सर्वात मोठा हिट ठरला आहे.
अनीतचा प्रवास
अनीत पड्डाने २०२२ मध्ये काजोलच्या ‘सलाम वेंकी’ मध्ये छोट्या भूमिकेतून अभिनयाची सुरुवात केली. २०२४ मध्ये ती ‘बिग गर्ल्स डोंट क्राय’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आली. आणि आता ‘सैयारा’ या चित्रपटामुळे ती मुख्य अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे.





