अन् 24 तासांच्या आत सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव झाला रद्द; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर….

मुंबई – थकित कर्जाबद्दल बॅंक ऑफ बडोदाने अभिनेता व भाजपचा खासदार सनी देओल याच्या जुहु येथील बंगल्याचा लिलाव पुकारला होता. परंतु तो लगेचच मागे घेण्यात आला आहे. लिलावीची ही नोटीस बॅंकेने तडकाफडकी मागे घेतल्याने कॉंग्रेस पक्षाने त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
तांत्रिक कारणामुळे हा लिलाव रद्द करण्यात आल्याचे बॅंकेने म्हटले आहे, पण हे तांत्रिक कारण निर्माण होण्यास नेमके कोण कारणीभूत होते असा सवाल कॉंग्रेस पक्षाने उपस्थित केला आहे.
या घडामोडीवर भाष्य करताना कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मिडीयावर म्हटले आहे की, “काल दुपारी देशाला कळले की बॅंक ऑफ बडोदाने भाजप खासदार सनी देओल यांचे जुहू येथील निवासस्थान ई-लिलावासाठी ठेवले आहे त्यांच्याकडे 56 कोटी रूपयांच्या थकबाकीची वसुली आहे.
त्यासाठी हा लिलाव पुकारण्यात आला होता पण आज सकाळी, 24 तासांपेक्षा कमी कालावधीत, देशाला कळले की बॅंक ऑफ बडोदाने ‘तांत्रिक कारणांमुळे’ लिलावाची नोटीस मागे घेतली आहे.
हे तांत्रिक कारण कोणामुळे निर्माण झाले याचे आश्यर्य वाटते असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. येत्या 25 ऑगस्ट रोजी हा लिलाव होणार होता. सनी देओल हे भारतीय जनता पक्षाचे पंजाबातील गुरूदासपुर येथील खासदार आहेत.





