Pravin Tarde : …अन् नानांचा मला फोन आला! प्रवीण तरडेंनी सांगितला तो खास प्रसंग
Pravin Tarde : सर्वप्रथम आलेला फोन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा होता, अशी आठवण प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितली.

Pravin Tarde : प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाची नवी उंची गाठली आहे. २१ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांसह समीक्षकांचीही पसंती मिळवली असून, मराठी चित्रपटसृष्टीतील मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. चित्रपटाने १०० कोटींचा मोठा टप्पा ओलांडला आहे.
रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’नंतर १०० कोटींचा टप्पा पार करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर अनेक कलाकारांनी प्रवीण तरडे यांचे अभिनंदन केले. मात्र, सर्वप्रथम आलेला फोन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा होता, अशी आठवण प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितली.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “‘देऊळ बंद २’ यशस्वी झाल्यानंतर सर्वांत आधी नाना पाटेकरांचा फोन आला. त्याहून विशेष म्हणजे नीलकांती पाटेकर यांनी त्यांच्या शेतात आणि गावात काम करणाऱ्या २४ ते २६ महिलांना स्वतः तिकीट काढून थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवला. नाना आणि नीलकांती पाटेकर यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या त्या फोनने मला खऱ्या अर्थाने उभारी मिळाली.”
हेही वाचा : Satara News : दुर्दैवी घटना! फलटण तालुक्यात विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मोहन जोशी, स्नेहल तरडे, प्रवीण तरडे, महेश मांजरेकर यांच्यासह अनेक दमदार कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘देऊळ बंद २’ हा मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. अवघ्या १० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या ३९ व्या दिवशी १०० कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा गाठला. ही मराठी चित्रपटासाठी कौतुकाची बाब आहे.
शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, निकृष्ट बी-बियाणे, बनावट खतं-कीटकनाशकांचा वापर आणि सरकारी यंत्रणेकडून होणारा छळ अशा ग्रामीण वास्तवावर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडला आहे. चित्रपटात अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी महिला शेतकऱ्याची प्रभावी भूमिका साकारली असून, मोहन जोशी यांनी पुन्हा एकदा स्वामी समर्थ यांच्या भूमिकेत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
हेही वाचा : Salman Khan: मुंबईच्या रिमझिम पावसात सलमान खानचा मस्त अंदाज; दमदार फिटनेससोबत ‘मातृभूमी’ची दिली खास झलक





