Adnan Sami : …आणि नशीब बदललं; अदनान सामीच्या भारतात येण्यामागची रंजक गोष्ट, म्हणाला “भारतात स्थायिक होणे हा दैवी संकेत.”
Adnan Sami : अदनान यांच्या आवाजाने प्रभावित झालेल्या आशा भोसले यांनी त्यांना भारतात येऊन काम करण्याचा सल्ला दिला होता.

Adnan Sami : भारतीय संगीतविश्वात आपल्या सुरेल आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणारे गायक अदनान सामी आज भारतीय नागरिक म्हणून ओळखले जातात. मात्र, त्यांचा भारतात येण्याचा आणि कायमचा इथेच स्थायिक होण्याचा प्रवास अत्यंत रंजक आहे. विशेष म्हणजे, यामागे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची महत्त्वाची भूमिका होती.
१५ ऑगस्ट १९७१ रोजी ब्रिटनमध्ये जन्मलेल्या अदनान सामी यांची सुरुवातीची ओळख पाकिस्तानी वंशाचे गायक अशी होती. त्यांनी पाकिस्तानमध्येही संगीत क्षेत्रात काम केले, मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांची लंडनमध्ये एका संगीत कार्यक्रमादरन्यान गायिका आशा भोसले यांच्याशी भेट झाली. अदनान यांच्या आवाजाने प्रभावित झालेल्या आशा भोसले यांनी त्यांना भारतात येऊन काम करण्याचा सल्ला दिला होता.
त्यानंतर अदनान सामी एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी आणि एका अल्बमच्या निर्मितीसाठी भारतात आले होते. त्यांचा मुक्काम केवळ काही आठवड्यांचा असेल, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे ते फक्त महिनाभर पुरतील इतकेच कपडे घेऊन सोबत आले होते. मात्र, भारतात मिळालेल्या प्रेमामुळे आणि संधींमुळे त्यांचा हा अल्पकालीन प्रवास कायमस्वरूपी वास्तव्यात बदलला.
अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अदनान सामी यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले “भारतात स्थायिक होणे हा आयुष्यातील एक दैवी संकेत असल्याचा माझा विश्वास आहे. १५ ऑगस्ट, म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यदिनीच माझा वाढदिवस येतो, याकडे विशेष योगायोग म्हणून मी पाहतो.”
बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळवल्यानंतर अदनान सामी यांनी २०१६ मध्ये भारतीय नागरिकत्व स्विकारले. त्यानंतर ते भारताचाच अविभाज्य भाग बनले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली असून आजही ते संगीतप्रेमींच्या मनात विशेष स्थान राखून आहेत.
या गाण्यांमुळे झाले लोकप्रिय
प्रसिद्ध गायक अदनान सामी यांच्या लोकप्रिय आणि हिट गाण्यांमध्ये ‘तेरा चेहरा’, ‘भर दो झोली मेरी’ (बजरंगी भाइजान), ‘भीगी भीगी रातों में’, ‘सुन जरा’ आणि ‘लकी टाईम फॉर लव्ह’ मधील गाण्यांचा समावेश आहे. त्यांची गाणी त्यांच्या मधूर आवाजासाठी आणि रोमँटिक शैलीसाठी ओळखली जातात. ‘इश्क तमाशा’ (Ishq Tamasha) आणि ‘लिपस्टिक’ (Lipstick) हे त्यांचे अलीकडचे नवीन अल्बम आहेत.
purangabbi : ‘आवारापन 2’मधील हा खलनायक कोण? दमदार भूमिकेने वेधले लक्ष





