PHOTOS : कबरीमध्ये सापडली पुरातन तलवार; 3000 वर्षानंतरही सुस्थितीत

बर्लिन – पश्चिम जर्मनीमध्ये एका ठिकाणी पुरातत्त्व खात्यातर्फे खोदकाम सुरू असताना एका कबरीमध्ये संशोधकांना एक अतिशय पुरातन तलवार सापडली आहे. तब्बल 3000 वर्षांपूर्वीची ही तलवार असून ती अद्यापही सुस्थितीत आणि चमकदार आहे. या तलवारीसोबत संशोधकाना या कबरीमध्ये तीन मृतदेहांचे अवशेषही सापडले असून इसवी सन पूर्व चौदाव्या शतकातील ही तलवार असू शकते अशी माहिती देण्यात आली आहे.
ही तलवार कास्य धातूपासून बनवली असून सुमारे 3000 वर्षांपूर्वीच कास्य युग विकसित झाले होते. संशोधक नोरेनबर्ग परिसरामध्ये खोदकाम करीत असताना त्यांना ही कबर सापडली आणि त्या कबरीमध्ये ही तलवारही सापडली. आतापर्यंत या परिसरामध्ये अनेक पुरातन अवशेष सापडत असले तरी एकाच कबरीमध्ये तीन जणांचे मृतदेह आणि त्याच्यासोबत तलवार सापडणे ही अतिशय वेगळी गोष्ट असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. त्या कबरीमध्ये जे तीन मृतदेहांचे अवशेष सापडले त्यामध्ये एक महिला एक पुरुष आणि एक लहान मुलगा यांचा समावेश होता.
तीन हजार वर्षापूर्वीच्या संस्कृतीचा विचार करता मृतदेहांसोबत इतर कोणत्याही गोष्टी दफन केल्या जात नसत पण ज्या अर्थी या तीन मृतदेहांसोबत ही तलवार पुरण्यात आली होती त्याअर्थी या तलवारीचे संरक्षण करण्याच्या हेतूनेच हा दफनविधी करण्यात आला असावा, असे संशोधकांचे म्हणणे आहे या तलवारीचे नजीकच्या कालावधीमध्ये आणखीन संशोधन करण्यात येणार आहे. या तलवारीची रचना पाहता ती अष्टकोनी असून त्याच्या हँडलवर काही डिझाईनही करण्यात आले आहे. त्यामुळे ही तलवार लढण्यासाठी तयार करण्यात आली नसून एक प्रतिकात्मक शस्त्र म्हणून त्याचा वापर करण्यात येत असावा, असे संशोधकांचे मत आहे.





