Anaya Slam Kapp : “आधी नीट अभ्यास करा अन् मग…!”; विरोध करणाऱ्या मारिझान कॅपच्या टीकेला अनाया बांगरचे सडेतोड प्रत्युत्तर
Anaya Slam Kapp : अनाया बांगरने नाव न घेता क्रिकेट खेळण्यावर आक्षेप घेणाऱ्या मारिझान कॅपला सुनावलं आहे.

Anaya Bangar Hits Back At Marizanne Kapp Over Transgender Cricket Participation : भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची ट्रान्सवुमन मुलगी अनाया बांगर (Anaya Bangar) हिला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्थानिक महिला क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी दिल्यानंतर जागतिक पातळीवर नवा वाद सुरू झाला आहे. दक्षिण आफ्रिकेची स्टार क्रिकेटपटू मारिझान कॅपने या निर्णयाला ‘हास्यास्पद’ म्हणत तीव्र आक्षेप घेतला होता. आता अनाया बांगरने नाव न घेता तिला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. याशिवाय, स्वतःच्या देशातील क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयच्या मौनावर आणि भूमिकेवर अनायाने अत्यंत तीव्र शब्दांत निराशा व्यक्त केली आहे.
‘विरोध करणाऱ्यांनी आधी अभ्यास करावा!’; मारिझान कॅपला थेट उत्तर –
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना अनायाने विरोधकांचा समाचार घेतला. ती म्हणाली, “जे लोक माझ्या खेळण्याला विरोध करत आहेत, त्यांनी आधी या संपूर्ण प्रक्रियेची आणि नियमांची योग्य माहिती करून घेतली पाहिजे. मला मैदानात कोणताही अतिरिक्त किंवा अनुचित फायदा (Unfair advantage) मिळत नसून, मी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सर्व वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करत आहे. जर कोणाचे वैयक्तिक मत विरोधात असेल, तर त्यांनी आधी या विषयाचा सखोल अभ्यास करावा आणि मगच बोलावे.”
‘तो काळ अतिशय एकाकी होता!’; लिंगबदलाच्या संघर्षावर अनाया भावूक –
#WATCH | Mumbai, Maharashtra: On making a comeback in cricket, Anaya Bangar, a cricketer and the daughter of former Indian international cricketer and national batting coach, Sanjay Bangar, said, “To be honest, the women’s standard in Australian cricket, I think it’s of the… pic.twitter.com/nNjI4xIltI
— ANI (@ANI) August 29, 2026
आपल्या संघर्षाच्या प्रवासावर बोलताना अनाया म्हणाली, “ट्रान्सजेंडर म्हणून स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रवास अत्यंत एकाकी करणारा होता. जगभरातील सध्याच्या सामाजिक व राजकीय वातावरणात हा लढा सोपा नव्हता. अनेकदा मला समजून घेणारे कोणीच नाही असे वाटायचे. प्रत्येकजण सल्ले देत होता, पण माझी परिस्थिती काय आहे हे मला ठाऊक होते. या कठीण काळात मीच स्वतःची खरी सोबती होते, आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळेच मी हा टप्पा पार करू शकले.”
‘बीसीसीआयचे मौन वेदनादायी!’; भारतीय मंडळाकडून धोरण आखण्याची अपेक्षा –
क्रिकेट पुन्हा खेळण्यासाठी तिने बीसीसीआयकडेही दाद मागितली होती; मात्र बोर्डाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावर नाराजी व्यक्त करताना अनाया म्हणाली, “बीसीसीआयने या गंभीर मुद्द्यावर पूर्णपणे मौन बाळगले, ही गोष्ट अत्यंत निराशाजनक आणि मनाला चटका लावणारी आहे. या बदलामुळे माझे क्रिकेट सुटू शकते याची मला भीती होती. मला आशा आहे की बीसीसीआय या विषयावर सकारात्मक विचार करेल आणि भविष्यासाठी स्वतःचे एक स्पष्ट व सर्वसमावेशक धोरण तयार करेल.”





