Anandrao Malgunde : अपात्रतेचा निर्णय राजकीय द्वेषातून; आनंदराव मलगुंडे यांचा विरोधकांवर हल्लाबोल
माझा न्यायदेवता आणि भारतीय संविधानावर पूर्ण विश्वास असून या राजकीय दबावातून झालेल्या निर्णयाविरोधात मी दाद मागणार आहे. ही न्यायालयीन लढाई आम्ही निश्चितपणे जिंकू," असा ठाम विश्वास उरुण-ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे (Anandrao Malgunde) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Anandrao Malgunde : “गेल्या सहा महिन्यांत आम्ही सहकाऱ्यांना सोबत घेऊन शहराच्या खुंटलेल्या विकासाला मोठी चालना दिली आहे. याच विकासकामामांमुळे विरोधकांच्या पोटात शुळ उठला असून, त्यातूनच हे अपात्रतेचे राजकारण सुरू आहे. मी कोणतेही अतिक्रमण केलेले नाही.
माझा न्यायदेवता आणि भारतीय संविधानावर पूर्ण विश्वास असून या राजकीय दबावातून झालेल्या निर्णयाविरोधात मी दाद मागणार आहे. ही न्यायालयीन लढाई आम्ही निश्चितपणे जिंकू,” असा ठाम विश्वास उरुण-ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे (Anandrao Malgunde) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
३९ वर्षांत चुकीचे काम केले नाही: आनंदराव मलगुंडे
पत्रकार परिषदेत बोलताना नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे (Anandrao Malgunde) म्हणाले की, गेल्या ३९ वर्षांच्या सार्वजनिक आणि राजकीय कालावधीत मी कधीही कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. बसस्थानक (स्टँड) परिसरात असणाऱ्या आमच्या इमारतीमध्ये कोणतेही अतिक्रमण नाही.
जर खरोखरच तिथे अतिक्रमण होते, तर आजपर्यंत तहसीलदार, प्रांत अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी मला कोणतीही नोटीस का बजावली नाही? आम्ही आमची कायदेशीर बाजू प्रशासनासमोर मांडली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ राजकीय दबावापोटी हा दुर्दैवी आणि अन्यायकारक निर्णय दिला आहे. या निर्णयाविरोधात आम्ही सर्व कायदेशीर कागदपत्रे घेऊन सोमवारीच न्यायालयात दाद मागणार आहोत.
हा जनतेचा अपमान: राष्ट्रवादी (शप) शहराध्यक्ष शहाजी पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी मलगुंडे (Anandrao Malgunde) यांच्या पाठीशी ठाम उभे राहत विरोधकांचा निषेध केला. “आनंदराव मलगुंडे हे शहरातील जनतेने प्रचंड मताधिक्याने निवडून दिलेले लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. विरोधकांनी केवळ राजकीय आकसापोटी प्रशासनाला हाताशी धरून त्यांना अपात्र ठरवले आहे. हा निर्णय मलगुंडे यांच्यावर नसून शहरातील तमाम जनतेचा अपमान करणारा आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
उपनगराध्यक्ष आणि माजी नगरसेवकांचा प्रशासनावर सवाल
उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव यांनी कायदेशीर बाजू मांडताना सांगितले की, एखाद्या व्यक्तीने पदाचा गैरवापर करून जागा बळकावली असेल तरच अशी कारवाई होऊ शकते. मात्र, दादांच्या संबंधित जागेचे २००२ मध्येच ‘गुंठेवारी नियमितीकरण’ झाले आहे. मग हा कायदा येथे कसा लागू होतो? विशेष म्हणजे, ज्यांनी निर्णय दिला तेच अधिकारी पुढे कोणाकडे अपील करायचे हे कसे सांगू शकतात? यावरूनच हे सर्व राजकीय द्वेषापोटी झाल्याचे स्पष्ट होते.
माजी नगरसेवक विजय कुंभार यांनीही प्रशासनाच्या घाईघाईने घेतलेल्या निर्णयावर आक्षेप घेतला. ते म्हणाले की, कायद्यानुसार १२ वर्षांनंतर कोणतीही मालमत्ता बेकायदेशीर ठरत नाही, मग २४ वर्षांपूर्वीचा विषय आताच कसा उकरून काढण्यात आला? अतिक्रमण आणि अपात्रता या दोन्ही गोष्टी अत्यंत विसंगत आहेत. माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील यांनीही, “राज्यात इतर अनेक महत्त्वाचे विषय प्रलंबित असताना मलगुंडे यांच्या बाबतीत हा निर्णय इतक्या झटपट कसा दिला गेला?” असा सवाल उपस्थित केला.
लोकभावनेचा अनादर; सर्व नगरसेवक मलगुंडे यांच्या पाठीशी
नगरसेवक डॉ. संग्राम पाटील यांनी प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, प्रशासनाने लोकभावनेचा अनादर करून शहरात अराजकतेला आमंत्रण दिले असल्याचे म्हटले. तर नगरसेवक संग्राम पाटील यांनी, “दादा हे शहरातील जनतेच्या मनातील लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत आणि सर्व नगरसेवक व शहरातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,” असा विश्वास दिला.
पत्रकार परिषदेला मान्यवरांची मोठी उपस्थिती
या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील, माजी नगरसेवक विजय कुंभार, महेश पाटील, नगरसेवक डॉ. संग्राम पाटील, एल. एन. शहा, सुभाषराव सूर्यवंशी, शंकरराव चव्हाण, संदीप माने आणि पुष्पलता खरात उपस्थित होते.
तसेच नगरसेवक शिवाजी जाधव, संग्राम पाटील, स्वरूप मोरे, सचिन कोळी, सुप्रिया पाटील, सविता आवटे, शुभांगी शेळके, मनीषा कुरळपकर, लता कुर्लेकर, पल्लवी नागे, रेखा जाधव, संध्या कांबळे यांच्यासह बाळासाहेब कोळेकर, आयुब हवलदार, अभिजित कुर्लेकर, अंगराज पाटील, भूषण शहा, विजय देसाई, राजू अडसूळ आणि गुरुराज माने आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





