Dharmaveer 2: ‘हे जर लोकांसमोर आणलं तर, लोक तुम्हाला घरात राहू देणार नाहीत…’; शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा, दिला थेट इशारा

Dharmaveer 2 | Anand Dighe : ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्यावर असलेल्या या चित्रपटानं लोकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर आता ‘धर्मवीर 2 ’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
चाहते ‘धर्मवीर 2’ ची आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर ही प्रतिक्षा संपली असून ‘धर्मवीर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, प्रेक्षकांनी या ट्रेलरला तुफान पसंती दिली आहे.
प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात प्रसाद ओक आणि क्षितिज दाते हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रसाद ओकने आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे.
धर्मवीर या सिनेमानंतर धर्मवीर 2 सिनेमाची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता होती. येत्या 9 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता या सिनेमात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
काल या चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि सिनेसृष्टीतील बडे कलाकार उपस्थित होते.
‘धर्मवीर 2’ हा चित्रपट एकनाथ शिंदे यांचे बंड आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या मृत्यूचे गूढ यावर आधारित असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. मात्र, या चित्रपटातील एका डायलॉगमुळे सध्या हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे.
त्यामुळे ‘धर्मवीर 2’ या चित्रपटावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. हे चित्रपट वगैरे सगळं बोगस आहेत, भंपक आहेत. आपल्या खोटेपणावर पांघरूण घालण्यासाठी असे चित्रपट काढले जात आहेत. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, त्यांच्या या टीकेवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “आम्ही चित्रपटात काही गोष्टी दाखवलेल्या नाहीत. त्यामुळे तुम्ही कशाप्रकारे आनंद दिघे यांना मानसिक त्रास दिला आहे.
हे जर लोकांसमोर आणलं तर लोक तुम्हाला घरात राहू देणार नाहीत. संजय राऊत यांनी दिघे साहेबांची एक मुलाखत वेगळ्या पद्धतीने छापली होती. त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांना ताडा लागला. त्यामुळे त्यांना तुरुंगावास भोगावा लागला”, असे नरेश म्हस्के म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “संजय राऊत हे नेहमी दिघे साहेबांचा तिरस्कार करायचे. मातोश्रीमध्ये तेल टाकण्याचे काम ते करायचे. काही गोष्टी आमच्या मुठीत आहेत, त्या उघडायला लावू नका”, असा इशारा नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना दिला.





