शिरुर येथील कामिनी ओढ्यात अज्ञात व्यक्तीने टाकले नायट्रिक ॲसिड

रांजणगाव गणपती ( वार्ताहर) : गणेगाव खालसा ता . शिरुर येथील कामिनी ओढ्यात अज्ञात इसमाने वाहनातून नायट्रिक ॲसिड टाकले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी नरगिडे यांनी दिली. सदर ओढ्यात हे ॲसिड टाकल्याने रांजणगाव परिसरात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. कारण या ओढ्यातील पाणी थेट कोंढापुरी येथील तळ्यात जाते व हे पाणी तळ्यातून रांजणगाव गणपती, शिक्रापुर या सारख्या गावांच्या पाणी पुरवठा योजना तसेच शेकडो शेतक-यांच्या शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन या तळ्यावरुन असल्यामुळे नागरिक चितेंत आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवारी रात्री च्या सुमारास अज्ञात वाहन चालकाने शिक्रापूर- मलठण रस्त्यावर गणेगाव हददीत नवीन पुलाजवळ वाहत्या पाण्यात नायट्रिक ॲसिड सोडल्यामुळे परिसरात उग्र स्वरूपाचा दर्प पसरला आहे. त्याच बरोबर ज्या ठिकाणी हे केमिकल सोडण्यात आले. तेथील गवत व झाडे ही जळुन गेली आहेत. सदर माहिती समजताच आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने या ठिकाणी येऊन पाहणी केली आहे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. नागरिकांनी या पुढील काही दिवस कोंढापुरी तलावातील पाणी शेतीसाठी, जनावरांना पिण्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी वापरु नये असे आवाहन आरोग्य सेविका राधिका उत्तम नरगिडे यांनी केले आहे.
या प्रसंगी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मंदा ढसाळ,पोलीस पाटील श्रीकांत झांजे, माजी पोलीस पाटील विनायक दंडवते, वाघाळे गावचे माजी उपसरपंच राजेंद्र भोसले, महिला पोलीस अधिकारी सविता काळे,पोलीस कर्मचारी ब्रम्हा पवार आदी उपस्थित होते. सदर घटनेतील दोषींचा तपास करुन कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी शिरूर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शेखर पाचुंदकर यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पाचुंदकर यांनी दिला आहे.
ग्रामस्थांनी व्यक्त केली खंत
गणेगाव खालसा ग्रामपंचायतीने जर शिक्रापूर- मलठण रस्त्यावर व ग्रामपंचायत परिसरात कॅमेरे बसवले असते तर या घटनेतील आरोपी तात्काळ सापडले असते. परंतु ग्रामपंचायत पदाधिका-यांना केवळ कार्यालयातील फर्निचर बदलण्यातच स्वारस्थ असल्याची खंत ग्रामस्थांनी बोलताना व्यक्त केली.





