आझम कॅम्पस मस्जिदीत होणार आयसोलेशन सेंटर

पुणे – संशयित करोना बाधितांच्या आयसोलेशनसाठी पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शुक्रवारी आझम कॅम्पस मशीद येथे पाहणी केली. आझम कॅम्पसचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, विश्वस्त तन्वीर इनामदार, ऍड. इफ्तेकार इनामदार आदी यावेळी उपस्थित होते.
“आझम कॅम्पस आणि डॉ. पी. ए. इनामदार यांनी योग्य पाऊल उचलले आहे. प्रशासनाने अशा ठिकाणी संशयित रुग्ण ठेवले, तर काळजी घेतली जावी, स्वच्छता ठेवली जावी, रुग्णांना योग्य जेवण मिळावे, कचऱ्याची शास्त्रीय विल्हेवाट लावावी’, अशी अपेक्षा असल्याचे शेखर गायकवाड यांनी सांगितले. अनेक संस्थांनी यासाठी पुढे यावे,’ असेही आयुक्त म्हणाले.
करोनाची व्याप्ती लक्षात घेता कॅम्प, भवानी पेठ, नाना पेठेला लागून असणाऱ्या आझम कॅम्पसच्या इमारतींमधील जागा संशयित रुग्णांच्या क्वारंटाइनसाठी देण्याची तयारी व्यवस्थापनाने दर्शवली होती. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वीकारला असून तसे पत्र कॅम्पसचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांना दिले होते. ही जागा ताब्यात देण्यासाठी स्वच्छता आणि सुविधांची तयारी बुधवारपासून सुरू झाली आहे. या जागेत साधारण 80 संशयित जणांची व्यवस्था होऊ शकणार आहे.





