कटाक्ष : सर गेले!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ राजकारणी मनोहर जोशी यांच्या जाण्याने राजकारणातील एक युग संपले. बाळासाहेबांनी पंखाला दिलेल्या बळामुळे ते लोकसभा अध्यक्षपदीही पोहोचले होते.
शिवसेनेची पडझड सुरू असतानाच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे निधन म्हणजे शिवसेनेला एक धक्काच म्हटला पाहिजे. 1968 साली मुंबई महापालिकेत नगरसेवक बनण्यापासून वाटचाल सुरू करणारे लोकसभेच्या अध्यक्ष पदापर्यंत पोहोचले होते. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषद या चारही सभागृहाचं सदस्य बनण्याचा त्यांना बहुमान लाभला होता. त्यांच्याआधी हा बहुमान लालूप्रसाद यादव यांना मिळाला होता आणि त्यांच्यानंतर शरद पवार!
पण शिवसेनेकडून सर्वात जास्त काळ सत्ता राखणारे केवळ बाळासाहेबांकरता पंत आणि इतरांकरता ‘सर’ असणारे मनोहर जोशी गेली बारा वर्षे अक्षरश: अडगळीत पडले होते. इतके की बाळासाहेबांच्या मृत्यूनंतरच्या पहिल्याच दसरा मेळाव्यात त्यांना उद्धव ठाकरेंच्या देखत अपमानित होत स्टेजवरून निघून जावं लागलं होत. कारण होत त्यांनी एका ‘खुल्या मुलाखतीत’ सध्याच्या शिवसेना नेतृत्वात बाळासाहेबांच्या इतकी ताकद नाही’, अशा प्रकारे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देणारे विधान केले होतं. प्रश्न होता बाळासाहेबांच्या स्मारकाला होणार्या विलंबाचा. 2012 साली सरांची राज्यसभेची टर्म संपली होती. त्यांना उद्धव ठाकरेंनी दुसरी टर्म नाकारली होती. त्यामुळे सर साहजिकच दुखावलेले होते.
त्याआधी 2007 साली सरांचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी मोठ्या प्रमाणात घेतलं जात होतं. भैरोसिंह शेखावत राष्ट्रपती पदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार होते. पण मराठी असण्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी प्रतिभा पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आणि तिथेच सरांची उमेदवारीची आशा संपली होती. पत्रकार परिषदेत दुखावलेले सर एक शब्दही न बोलता हसत हसत उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसून असायचे.पण एकदा माझ्याजवळ त्यांनी आपल्या मनातली सल व्यक्त केली होती. ‘जर सेनेने भैरोसिंह शेखावत यांना पाठिंबा दिला असता तर मी नक्की उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार राहिलो असतो.
शेखावत आपल्या व्यक्तिगत संपर्काच्या भरवशावर अनेक पक्षातून पाठिंबा मिळवू शकले असते. तोच पाठिंबा मलाही मिळाला असता, पुढे काहीही घडू शकलं असतं.’ तेव्हा काँग्रेसकडे केवळ 145 जागा होत्या. त्यामुळे छोट्या पक्षांच्या मतांना किंमत होती. उद्धव ठाकरेंच्या प्रतिभा पाटील यांना पाठिंबा देण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणारे विधान सर माझ्याकडे ‘ऑफ द रेकॉर्ड’ 2007 साली बोलले होते. पत्रकारितेचे नियम पाळत मी सतरा वर्षे हे विधान कुठेही वापरले नाही. त्याचवेळी सर बोलले होते शिवसेनेची युती करताना माझा कल नेहमी भाजपकडे असतो, तर संजय राऊतांचा राष्ट्रवादीकडे! उद्धव ठाकरे मात्र आपल्या दोन्ही सहकार्यांच्या वेगवेगळ्या मार्गाने स्वत:चा विकास करवून घेत होते. असो!
सरांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी विमानाने जाण्याची संधी मिळाली. एकदा एका छोट्या विमानाने जळगावला 1996 साली सुरेशदादा जैन यांच्या पक्ष प्रवेशासाठी जात असताना सर म्हणाले होते, ‘महाराष्ट्र सरकारची स्वत:ची विमान कंपनी काढण्याचा विचार आहे.’ माझ्यातला बातमीदार जागा झाला. मी म्हणालो, ‘सर, फार मोठी बातमी आहे. मी देऊ?’ त्यांनी संमती दिली. दुसर्या दिवशी जवळपास सर्व वृत्तपत्रात मी काम करत असलेल्या युनायटेड न्यूज ऑफ इंडियाच्या नावाने मी दिलेली बातमी छापून आली होती. सरांनी दुसर्या दिवशी आवर्जून मला बोलावले आणि त्यांचे जनसंपर्क अधिकारी अजय अंबेकर यांना सांगितले माझी मुलाखत केव्हाही माईणकरलाच द्यायची. एका मुलाखतीत सर्वच पेपरचं काम होतं.
मुख्यमंत्री म्हणून सरांची शेवटची मुलाखत 30 जानेवारी 1999 रोजी संध्याकाळी त्यांच्या कारमध्ये बसून दादरच्या एका कार्यक्रमाला जाताना घेतली होती. ती रॉयटरसाठी होती. दादरच्या कार्यक्रमाला बाळासाहेबांच्या आधी आपण पोचलं पाहिजे या चिंतेत सर होते. दुसर्याच दिवशी सरांचा राजीनामा घेतला गेला आणि नारायण राणे मुख्यमंत्री बनले. सरांना राजीनामा द्यायला सांगण्याच्या मागे त्यांच्या जावयाच्या मागे असलेल्या केसच कारण दिलं गेलं. पण माझ्या दृष्टीने 1998 लोकसभा निवडणुकीत सेना-भाजप युतीच्या फार कमी जागा निवडून आल्या होत्या हेच मुख्य कारण होतं. त्यामुळे ब्राह्मण मुख्यमंत्री बदलावा ही मागणी युतीच्या नेत्यांनी बाळासाहेबांकडे केली. त्यात जावयांवरील आरोपांची भर पडली असेल आणि या सर्वांचा परिपाक म्हणजे सरांचं मुख्यमंत्रिपद हिरावले गेलं होतं. सरांचे आणि प्रमोद महाजनांचे संबंध फार चांगले होते, भलेही गोपीनाथ मुंडेंशी तेवढी जवळीक नव्हती. महाजन वरळीच्या सरांच्या फ्लॅटमध्येच राहायचे.
मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपला वरचष्मा ठेवला होता. सगळे निर्णय सर एकहाती घेतात, नितीन गडकरी एकदा मला म्हणाले होते. 1980 मध्ये एस. एम. जोशी म्हणाले होते, महाराष्ट्राचा ब्राह्मण मुख्यमंत्री पन्नास वर्षांनी होऊ शकतो. पण पन्नास नव्हे केवळ पंधरा वर्षांत ब्राह्मण व्यक्ती मुख्यमंत्रिपदी बसू शकला तो केवळ बाळासाहेबांच्यामुळे! आणि म्हणून सर बाळासाहेबांना मानत होते. बाळासाहेबांना मोठं पद देण्याची जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी ते दान पंतांच्याच पदरात घातलं.
एकदा पत्रकार परिषदेत काँग्रेसकडे वंशपरंपरा असल्याची टीका करणार्या बाळासाहेबांना एका पत्रकाराने तुमच्या पक्षात दुसरा नेता कोण हा प्रश्न विचारला असता त्यांनी सरांकडे बोट दाखवलं होतं. पण सरांनी या घटनेचा कधीही गैरफायदा घेतला नाही. उद्धव ठाकरे कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर मी ऑफ द रेकॉर्ड बातचीतमध्ये त्यांना त्या घटनेचा दाखला देत छेडलं होत, तुम्ही कार्यकारी अध्यक्ष झाला असता तर… ‘शिवसेना संपली असती’, एक क्षणही न लावता त्यांनी उत्तर दिलं. शिवसेना पक्ष उभा होता ठाकरे या नावावर याची त्यांना कल्पना होती. इतर एक दोन सेना नेत्यांसारखं स्वत:ला खूप मोठं समजण्याची चूक त्यांनी केली नाही.
बाळासाहेबांना सांभाळणं ही सर्वात मोठी तारेवरची कसरत सर सहजगत्या करत. मोरारजी देसाई यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने एक स्मारक मुंबईत उभारू असं मुख्यमंत्री म्हणून सर म्हणाले. आणि बाळासाहेबांनी त्याला खुलेआम विरोध केला. अर्थात, बाळासाहेबांचाच शब्द प्रमाण मानला गेला. बाळासाहेब आणि सर यांच्यात एक Wave length दिसून पडायची. दोघेही एकमेकांना सांभाळून घ्यायचे. पण सरांची तशी Wave length उद्धव ठाकरे यांच्याशी कधी जुळलीच नाही.





