बारामतीत प्रॉपर्टी एक्स्पो प्रदर्शनास प्रतिसाद ; बांधकाम व्यावसायिकांचे सहकार्य बारामती – ग्राहकांना विविध कर्ज व सेवा सुविधा देताना यानंतरच्या काळामध्ये जलदगतीने आणि कमी कागदपत्रांमध्ये ग्राहकांना गृहकर्जे देण्यासाठी प्रयत्नशील असून ग्राहकांच्या प्रत्येक अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक (नेटवर्क) जोगेंद्र पाल सिंह यांनी केले. शहरातील मुक्ताई लॉन्स या ठिकाणी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या वतीने बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया आणि क्रेडाई बांधकाम क्षेत्रातील संस्थांच्या सहकार्याने प्रॉपर्टी एक्स्पो प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमहाव्यवस्थापक मुकेश कुमार सिंह, सहायक महाव्यवस्थापक पंकज कुमार सिंह, गृहकर्ज विभागाचे सहायक महाव्यवस्थापक अमिताभ श्रीवास्तव, क्रेडाईचे अध्यक्ष सुरेंद्र भोईटे, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष दीपक काटे, बारामती शाखा मुख्य व्यवस्थापक कृष्णकांत काळे, निखिलकुमार पवार, चंदनकुमार सिंह, शिल्पा खराडे उपस्थित होते. सर्वसामान्यांचे स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एसबीआय नेहमी साह्य करेल. गृहकर्ज घेत असताना कमी कागदपत्रे व जलद गतीने सेवा देणार असून बांधकाम व्यावसायिक व ग्राहकांना संतुष्ट व समाधानी करणार असल्याचे जोगेंद्र पाल सिंह यांनी सांगितले. यावेळी सुरेंद्र भोईटे, दीपक काटे यांनी गृहकर्जे घेत असताना सहकार्याची अपेक्षा व्यक्त करीत बारामतीच्या बांधकाम क्षेत्राबद्दल माहिती दिली. यावेळी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गृहकर्जे देताना जलद गतीने व कमी कागदपत्रात बारामती शाखेत मंजुरी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. बांधकाम व्यावसायिक यांच्या विविध स्टॉलवर आपले घर, दुकान, रो- हाउस, बंगला व मोकळे प्लॉट घेण्यासाठी व चौकशीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. बांधकाम व्यावसायिक भूषण ढवाण यांनी बॅंकेची व ग्राहकांची अपेक्षा याबद्दल माहिती दिली. यावेळी तात्काळ 52 ग्राहकांचे गृहकर्ज मंजूर करण्यात आले. सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी तर संदीपकुमार यांनी आभार मानले.